मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डय़ांच्या विळख्यात सापडला आहे. खड्डेयुक्त रस्त्यामुळे महामार्गावरील अपघात कमी होण्याचे नाव घेत नाहीत. खड्डय़ांत पाणीही साचून राहते आहे.

महामार्गावरील खड्डय़ांत पडल्याने तसेच हे खड्डे चुकवतानाही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. काहींनी आपला जीव गमवला आहे. काहीजण जखमी झाले तर काही कायमचे जायबंदी झाले. याच खड्डय़ामध्ये गाडी जाऊन तिचा टायर फुटल्यामुळे गाडी बाजूला घेऊन टायर दुरुस्त करताना, मागील एका गाडीने दिलेल्या धडकेत एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची घटनाही ताजी आहे.

गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर खड्डय़ांचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर लहानमोठय़ा आकाराचे विविध खड्डे पडले आहेत. महामार्गावर पाण्याचा निचरा होण्यास अनेक ठिकाणी जागाच नसल्याने पावसाचे पाणीसुद्धा या खड्डय़ांत साठून राहते. नांदगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून हे पाणी तसेच साचून आहे. शिवाय पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी काढलेला गाळसुद्धा त्या पाण्याबरोबरीने महामार्गावर पडून आहे. महामार्ग प्राधिकरण मात्र या सगळय़ाकडे डोळेझाक करत आहे. महामार्गावर टोल वसुली करणारी संस्थाही त्याकडे सपशेल कानाडोळा करते.
महामार्गाविषयक विविध प्रश्नांवर वेळोवेळी विविध संघटना, वाहन चालक संघटनांचे प्रतिनिधी, सेवाभावी संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत. मात्र या पत्रव्यवहारांना महामार्ग प्राधिकरणाने केराची टोपली दाखवली आहे. अपघातांची माळच लागल्यासारखी परिस्थिती आहे. मग आता एखाद्या मोठय़ा अपघातात अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला की मगच महामार्ग प्राधिकरण जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अलीकडेच महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका नवीन कंत्राटदाराला देण्यात आले आहे, परंतु त्यांनी यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित करून कामाला सुरूवात केलेली दिसत नाही. खड्डे बुजवण्याप्रकरणीही हा ठेकेदार असमर्थ आहे. त्यामुळे आता त्याला बडतर्फ करून त्याच्याकडील कंत्राट काढून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

महामार्गावरील खड्डे व त्यामुळे घडणारे अपघात लक्षात घेऊन आमदार राजेश पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून हे खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत अन्यथा टोल नाक्यावर आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. तर आमदार विनोद निकोले यांनी याच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने महामार्गाच्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्याचे म्हटले आहे. मात्र दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पत्रांनंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.

संपूर्ण महामार्ग खड्डेमय
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदरपासून ते तलासरी या पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामध्ये आंबोली, धानिवरी, विवळवेढे, चारोटी उड्डाणपुलाच्या खाली व वर, चारोटी टोल नाक्याच्या दुतर्फा, तवा, सोमटा, खडकोना, मेंढवन, चिल्हार फाटा सेवा रस्ते दुतर्फा, नांदगाव, याच परिसरातील सती माता हॉटेल, मनोर उड्डाणपुलाच्या आधी गुजरातच्या दिशेने, पेलहार, खानिवडे, बोट, शिरसाट फाटा, मालजीपाडा ते फाउंटन हॉटेल अशा ठिकाणी अनेक लहान मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

खानिवडे टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन
महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांबद्दल अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही त्याची दखल न घेतल्याने काँग्रेसमार्फत खानिवडे टोल नाक्यावर टोल रोको आंदोलन केले गेले. खड्डय़ांची दुरुस्ती करत नाही तर टोल का वसूल करता? असा सवाल करत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. सुविधा पुरवा त्यानंतरच टोल घ्या, अशी मागणी यावेळी केली गेली. वाहनचालकांना, टोल न देण्याचे आवाहन करून काही काळ टोल बंद करण्यात आला होता.

श्रमदानातून बुजवले खड्डे
महामार्गावर चारोटी परिसरामध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी पोलीस, स्थानिकांनी एकत्र येऊन खड्डे बुजवले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिल्हार फाटा परिसरामध्ये निर्माण झालेले खड्डे महामार्गावर काम करणाऱ्या समाजमाध्यम समूहाचे प्रतिनिधी, वाहनचालक मालक संघटनेचे प्रतिनिधी, स्थानिक, रुग्णमित्र व मृत्युंजय दूत तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत श्रमदानातून बुजवले होते. प्राधिकरण मात्र या खड्डय़ांकडे दुर्लक्ष करत आहे