जिल्ह्यतील रुग्णालयांबाहेर निवारा स्थापन करण्याची मागणी

पालघर : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालघर जिल्ह्यतील रुग्णालयांत रुग्णांच्या सोबत येणाऱ्या व राहणाऱ्या नातेवाईकांसाठी जिल्ह्यतील कोणत्याही शासकीय रुग्णालयाबाहेर निवारा केंद्रे नाहीत. त्यामुळे या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही गैरसोय आताच नव्हे तर गेल्या अनेक महिन्यांपासून आहे.

जिल्ह्यतील शासकीय उपचार केंद्रांमध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या  प्रकृतीची व तब्येतीची माहिती मिळावी यासाठी नातेवाईक रुग्णालयाबाहेर थांबून असतात. तसेच रुग्णाला काही समस्या उद्भवल्यास ती माहिती देता यावी तसेच रुग्णांच्या इतर देखभालीसाठी एका नातेवाईकानी बाहेर थांबावे असे काही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र रुग्णालयाबाहेर किंवा आजूबाजूच्या परिसरात या नातेवाईकांना निवारा केंद्रे नसल्यामुळे त्यांना ताटकळत राहावे लागते. परिणामी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी हे नातेवाईक आपले बस्तान बसवत आहेत.

ग्रामीण भागातील काही नागरिक रुग्णालय परिसरात चूल पेटवून तेथे आपले जेवण बनवीत आहेत. निवारा केंद्र नसल्यामुळे नातेवाईकांना कडक उन्हामध्ये काही ठिकाणी उभे राहावे लागत आहे. तर काही जण जिथे-तिथे सावलीचा आसरा घेत त्या सावलीखाली विसावा घेताना दिसत आहेत. या नातेवाईकांसाठी काही रुग्णालये रुग्णालयात येणारे जेवण, चहा, नाश्ता देते. रुग्णालय परिसरामध्ये नातेवाईकांचा मोठा वावर असतो. मात्र परिसर र्निजतुकीकरण यावर लक्ष दिले जात नाही.

रुग्णालयमध्ये उपचार केंद्र असल्यामुळे नातेवाईकांची नैसर्गिक विधीसाठी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यात महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालये स्थापन केली असली तरी जिल्हा प्रशासनाने रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची सोय अजूनही केलेली नाही. त्यामुळे त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. अलीकडेच आलेल्या वादळी पावसामुळे नातेवाईकांना चक्क उपचार केंद्रांमध्ये आसरा घेऊन राहावे लागले, हे त्यांच्यासाठी घातक आहे. रुग्णालयांचा आसरा घेताना एखाद्या नातेवाईकालाा करोनाची लागण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

रुग्णालयाबाहेर डासांचा सामना नातेवाईकांना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाचा आसरा घ्यावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्रे स्थापन करुन त्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी यानिमित्ताने समोर येत आहे.