कुटीर रुग्णालय डॉक्टरांच्या प्रतीक्षेत
डहाणू: डहाणू वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील कुटीर रुग्णालयातील पाच वैद्यकीय अधिकारी हे पालघर, विक्रमगड आणि विरार येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णांना तिष्ठत राहावे लागत आहे.
डहाणू कुटीर रुग्णालयाची इमारत ५० वर्ष जुनी असून इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्याने गैरसोयीला तोंड द्यावे लागते आहे. याबाबत डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी आरोग्य मंत्र्यांशी भेट घेऊन नवीन इमारतीची मागणी केली आहे. त्याबाबत आरोग्य मंत्र्यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र प्रशासन दिरंगाई करत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. डहाणू तालुक्यात करोना, लेप्टो व तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. डहाणूचे कुटीर रुग्णालय सर्व सेवांनी परिपूर्ण असले तरी येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीच नाही. फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञाची कमतरता भासत आहे. कुटीर रुग्णालयात नेमणुकीत असलेले फिजीशियन, आर्थोपिडीक आणि एमबीबीएस असे पाच वैद्यकीय अधिकारी पालघर, विक्रमगड आणि विरार येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची पदे कागदोपत्री शासनदरबारी भरलेली दिसत आहेत. रुग्णालयात सध्या फक्त नऊ डॉक्टर आहेत. डहाणू कुटीर रुग्णालयात आणखीन सहा डॉक्टरांची गरज असून हे डॉक्टर दिल्यास कुटीर रुग्णालयातून चांगल्या सेवा देता येतील. पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसांत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तापाचे रुग्ण वाढत आहेत. उपचार वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू होण्याची स्वप्न देखील अधुरेच राहिले आहे.
दरम्यान, डहाणू कुटीर रुग्णालयात सर्व पदे भरण्यात आली आहेत. मात्र काही तज्ज्ञ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहेत. त्याचा ताण इतरांवर पडत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, आणि कुटीर रुग्णालय अधीक्षक डॉ. बालाजी हेंगणे यांनी सांगितले. डहाणू येथे नेमणुकीत असलेले तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी नेमण्यात यावेत. तसेच नवीन इमारतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. तालुक्यातून येणाऱ्या गोरगरिबांना एकाच ठिकाणी मोफत उपचार मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी म्हटले आहे.