वन विभागाने वेळीतच ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता

वाडा : उन्हाळ्यात वाढत्या “वणव्यांमुळे अनेक परिसरातील जंगले बेचिराख होण्याच्या घटनांमद्ये वाढ झाली आहे. हे वणवे निसर्ग व मानवनिर्मित दोन्ही प्रकारचे असुन ते वेळीतच रोखुन वन संपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने डोंगर परिसरातील स्थानिक नागरीकांच्या पुढाकाराने जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाडा, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांत काही प्रमाणावर जंगले शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी जंगलामध्ये उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने वन संपत्तीचा मोठा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आहे, वनविभागाकडून मात्र यावर कुठलीही ठोस उपाययोजना होताना दिसुन येत नाही.

जंगलात लागणाऱ्या आगींमध्ये अनेक सरपटणारे प्राणी, कीटक, पक्ष्यांची घरटी, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी जळून खाक होत असल्याने पशु – पक्ष्यांना जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे वन्यजीवांसोबत नैसर्गिक”वन संपत्ती” देखील नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वन आणि वन्यजीव” संवर्धनाकरिता वनप्रेमी तसेच वनअधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. मात्र तरीही समाजकंटक आणि वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगलात वणवे लागण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत वनप्रेमी व वन्यजीव अभ्यासक यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे शासन हे वन व वन्यजीव संवर्धनाकरिता “गावोगांवी, शाळा- महाविद्यालयात जंगल बचाव, वृक्ष लागवड याबाबत जनजागृती शिबीरांची मोहीम हाती घेत आहेत. मात्र दुसरीकडे राखीव असलेली जंगले, कुरणे वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वणव्यांच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसुन येत आहे. याला कोण जबाबदार आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. शासन आणि वन विभागाने याकडे वेळीतच लक्ष देवुन नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जव्हार वन विभागाच्या अंतर्गत वाडा तालुक्यातील वाडा पुर्व व वाडा पश्चिम असे दोन वनपरिक्षेत्र येतात.

यातील वाडा पूर्व हद्दीत राखीव वन, संरक्षित वन, संपादित वन असे एकूण ८,९०९.९८२ हेक्टर वनक्षेत्र आहे. या भागात २०२५ वर्षात जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील मार्च महिन्यात वेगवेगळ्या नियतक्षेत्रात १० ठिकाणी वणव्यांमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत.

यात मांगरूळ (१७.५ हे.), पिंजाळ (३.५ हे.), उज्जैनी (९.५ हे), पीक (१.६), उ. मांडवा (१.८ हे.), वडवली (४.१ हे.), मानिवली (५ हे.), शेले (२० हे.),

कोलिम सरोवर (४ हे.), भोईरपाडा (३.७६ हे.) या नियतक्षेत्रांमद्ये एकूण ८० हेक्टर क्षेत्र जळाले आहे.

हि माहिती वाडा पूर्व वनविभागाकडून मिळाली.

वाडा पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांना वणव्यांची माहिती विचारली असता त्यांच्याकडुन मिळू शकली नाही. तर वनपरिक्षेत्र वैतरणा (वन्यजीव) विभाग यांच्या हद्दीतील ८ हजार हेक्टर वनक्षेत्रापैकी केवळ दीड (१.५) हेक्टर क्षेत्र वणव्याच्या आगीत जळालेले आहे. तसेच “झिरो फायर” ही मोहीम राबवित असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली.

वणवे कसे लागतात

* अनेकदा स्थानिक नागरिक जंगलात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी काही परिसरात आग लावतात किंवा शेकोटी पेटवतात.

* काहीजण वृक्ष तोडीसाठी रस्त्याने जाता- येता विडी, सिगारेट, पेटवून पेटती काडी जमिनीवर टाकतात.

* काहीजण शेतातील झाडांवर असणारे मधमाशांचे पोळी काढण्यासाठी तसेच वनालगतच्या शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावतात. ही आग आटोक्यात न आल्यास “वणवे” लागतात

जंगलातील वणव्यांमुळे होणारे दुष्परिणाम:

* बहुमोल व शेकडो वर्षे जुनी वन संपत्ती नष्ट होवुन जैवविविधतेचा ऱ्हास होतो.

* गवत, झाडे, झुडपे यांची नैसर्गिक पुनरुत्पती थांबते.

* वन्यजीवांना जीव गमावा लागतो.

* जंगलातील आग वातावरणात विषाणू वायुंसह हानिकारक प्रदूषके सोडतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते आणि मालमत्ता, पिके, प्राणी संसाधने आणि नागरिकांचे मोठे नुकसान होते.

* जंगलातील आगीमुळे उन्हाळ्यात तीव्र उष्णता वाढली आहे. सोबतच मानव व पशु -पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

* जमीन उघडी पडल्याने पावसाळ्यात ओहळ, नदी – नाले, तलाव आणि धरणांमध्ये मातीमुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा येतो, त्यामुळे साठवण क्षमता कमी होते.

वाडा पूर्व वनक्षेत्रांत अज्ञात इसमांकडून आगी लावल्या जात आहेत. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा वनरक्षक, वनमजुर व स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रित करणाऱ्या मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

तसेच जंगलात अद्याप पर्यंत आग लावताना कुणी आढळून आलेला नाही, मात्र अध आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. – उत्तम पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, वाडा पुर्व