पालघर: डहाणू तालुक्यातील किमान २५ ते ३० एकर क्षेत्रफळावर रानडुकरांनी नुकसान केले आहे. परंतु त्या बाधित शेतकऱ्यांना आजवर नुकसानभरपाई मिळालेली नाही. कृषी विभागाकडे अशा प्रकारचे अर्थसाहाय्य करण्याची तरतूद नाही, असे सांगण्यात येते. तर वन विभागाकडून मिळणारी मदत फारच तुटपुंजी आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणी, ताणीशी, चिंचणी, देदाळेपासून थेट वाणगावपर्यंतच्या क्षेत्रात फेब्रुवारीच्या मध्यावर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला. शेतातील मिरची, अळू, केळी, कांदे, नारळ आणि इतर भाजीपाला याचे नुकसान केले. डुकरांनी अनेक ठिकाणी झाडांची मुळे खणून काढली तसेच शेणखताचे नुकसान केले. या नासधुसीमुळे शेतकऱ्यांचे दर एकरास ५० हजारांचे नुकसान झाल्याचे, त्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात काही बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मदतीसाठी अर्ज केले होते. त्यावेळी रानडुक्करांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास कृषी विभागाकडे कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात आले. तर वन विभागाकडून भाजीपाला लागवड नुकसानीसाठी तुटपुंजी मदत मिळते. शिवाय त्याच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करून घेणे आवश्यक असते.
पालघर व डहाणू तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून रानडुकरांचा त्रास वाढला आहे. पण वन विभाग त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही. रानडुक्कर संरक्षित प्राणी असल्याने त्याची शिकार करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शेतकरी रानडुक्कर मारू शकत नाहीत. रानडुकरांची प्रचंड पैदास झाल्यानेच हा त्रास होत आहे. त्यामुळे तळ कोकणांत आणि राज्याच्या इतर भागांत रानडुकरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत, तशाच पालघर जिल्ह्यातही राबवाव्या, यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा