बोईसर : राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात प्रवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील एसटीच्या आठ स्थानकांची पाहणी केली असता येथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक त्रुटी दिसून येत आहेत. बस स्थानक आवारातील बेकायदा पार्किंग आणि गैरप्रकार बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभाग अंतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, सफाळे, अर्नाळा, नालासोपारा आणि वसई या आठ एसटी आगारांचा समावेश होतो. पालघर विभागासाठी एक सुरक्षा व दक्षता अधिकारी नियुक्त असून त्यांच्या अधिपत्याखाली या आठ आगारांमधील सुरक्षेवर नियंत्रण ठेवले जात आहे. पालघर विभागीय कार्यालय आणि कार्यशाळेसह एकूण ४४ सुरक्षारक्षकांवर येथील सुरक्षेची जबाबदारी आहे. मात्र बहुतेक सर्व बस स्थानकांमध्ये प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

पालघर विभागातील बोईसर हे सर्वाधिक वर्दळीचे बस स्थानक म्हणून ओळखले जात असून आगारातून लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक अशा दैनंदिन एकूण ४७५ फेऱ्या चालविल्या जातात. तारापूर औद्याोगिक क्षेत्रातील उद्याोगांमध्ये काम करणारा कामगार वर्ग, मुंबई आणि वसई-विरार भागात कामानिनित्त ये-जा करणारे कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एसटी सेवेवर अवलंबून आहेत. पहाटे सहापासून रात्री उशिरा शेवटच्या उपनगरी गाडीच्या वेळेपर्यंत एसटी सेवा कार्यरत असते.

बोईसर एसटी स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असून त्यांवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बसस्थानक तारापूर रस्त्यालगत असल्याने परिसरात खासगी दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा यांसारख्या प्रवासी वाहनांची दिवसरात्र मोठी वर्दळ सुरू असते. रिक्षा, इकोसारखी प्रवासी वाहने पालघर, मनोर, तारापूर, मुरबे, दांडी या मार्गावर धावणाऱ्या बसच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी मिळविण्यासाठी बस स्थानकाच्या आतपर्यंत घुसखोरी करीत असतात. बोईसर एसटी स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असले तरी पश्चिम बाजूला संरक्षण भिंत नसल्याने तसेच कार्यशाळेच्या मागील भिंत पावसामुळे कोसळल्याने अनेक जण बेकायदा प्रवेश करतात. बस स्थानक आणि कार्यशाळेच्या दरम्यान असलेल्या निर्जन भागात झाडी झुडपे असून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास प्रेमीयुगुले, मद्यापान, धूम्रपान आणि अमलीपदार्थ सेवन करणारे, भुरटे चोर आणि गर्दुल्ले यांचा वावर असतो. एस टी स्थानकात गैरप्रकार करणाऱ्यांचा नित्यनेमाने वावर सुरू असल्याने रात्रीच्या सुमारास बसच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी विशेषत: महिला प्रवासी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. गैरधंदे करणाऱ्यांच्या समोर सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षकदेखील हतबल होताना दिसतात. बसस्थानक परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असते, मात्र यामध्ये सातत्य नसल्याने सुरक्षा योजना कुचकामी ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रिक्षाचालकांची घुसखोरी

पालघर बस स्थानकामध्ये रात्रीच्या सुमारास बाहेरगावावरून आलेल्या लांबपल्ल्याच्या बसमधील प्रवासी घेण्यासाठी काही रिक्षाचालक स्थानकाच्या आतपर्यंत घुसखोरी करतात. प्रवासी मिळवण्यासाठी अनेक वेळा काही रिक्षाचालकांमध्येच आपापसात वाद होण्याचे प्रकार घडत असतात. पालघर बस स्थानक परिसरात खासगी वाहनांची बेकायदा पार्किंग त्याचप्रमाणे टपोरी तरुणांचा वावर महिला प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

पुण्यातील घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभाग अंतर्गत सर्व बस आगारांमध्ये वरिष्ठांच्या सुचनेनुसार सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यात निश्चित सुधारणा करण्यात येतील. – कैलास पाटील, विभागीय नियंत्रक, पालघर विभाग