पालघर जिल्ह्यतील आकडेवारीचा संभ्रम मिटणार

पालघर : जिल्ह्यबाहेरील केंद्रांत उपचार घेत असलेल्या करोना रुग्ण वा मृतांची नोंद घेऊन ती त्यांच्या मूळ अधिवास असलेल्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने मज्जाव केला आहे. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या नोंदींमुळे आकडेवारीत होणारा संभ्रम कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यकडून तयार करण्यात येणाऱ्या करोना रुग्ण अहवालात नोंदवण्यात आलेल्या रुग्णाची माहिती त्यांच्या अधिवासाच्या मूळ (आधार कार्डावरील पत्त्यानुरूप) जिल्ह्यात हस्तांतरित करण्याची पद्धत अवलंबिली जात असल्याने पालघरसह अनेक जिल्ह्यंमध्ये जून महिन्यात मृतांच्या व रुग्णांच्या संख्येत वारंवार बदल होत होते. सातत्याने आकडेवारीत येत असलेली तफावत आणि उशिरा नोंद होत असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या लपवली जात असल्याचा संशय सर्वसामान्यांत निर्माण झाला होता. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी अलीकडेच काढलेल्या आदेशात ज्या जिल्ह्यत नागरिकाला करोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे त्याची कायमस्वरूपी नोंद त्याच जिल्ह्यात ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

करोना संसर्ग झालेला रुग्ण पाच-सात दिवसांपूर्वी इतर जिल्ह्यतून स्थलांतरित झाला असल्यास जोखीम संपर्कातील संशयित रुग्णांचा (कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग) शोध घेण्यासाठी त्या रुग्णासंदर्भातील माहिती ज्या ठिकाणाहून आलेल्या जिल्ह्यांना कळविण्याची मुभा दिली आहे. मात्र करोना रुग्ण व मृतांच्या आकडेवारीतून गुंतागुंत, गोंधळ व तफावत दूर करण्यासाठी नवीन नियमांच्या आधारे करोना रुग्णांची नोंद करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या आहेत. जिल्ह्यात असलेल्या महानगरपालिका व ग्रामीण भागातील रुग्णांची माहिती त्यांच्या स्थानिक पत्त्याच्या आधारावर विभागली जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय अहवाल लवकरच

करोना रुग्णवाढीबाबतच्या दैनंदिन अहवालामध्ये त्रुटी दिसू लागल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करणेच बंद केले होते. मात्र, आता रुग्ण नोंदीबाबत राज्य सरकारकडून स्पष्ट सूचना प्राप्त झाल्याने जुन्या आकडेवारीमधील चुका दूर करून अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे जिल्हा आरोग्य विभागाने कळवले आहे. दरम्यान राज्य शासनाकडून प्राप्त होणारी आकडेवारी उशिराने प्राप्त होत असल्याने ही माहिती जिल्हास्तरावर प्रसारित करण्यात विलंब होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. या आकडेवारीच्या आधारावर तालुकास्तरीय करोना रुग्णांची माहिती प्रसिद्ध करण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.