पालघर : पालघर जिल्ह्यातील पर्यटनाकरिता प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रकिनारी केळवे बीच पर्यटन महोत्सव १८ ते २० एप्रिल दरम्यान भरविण्यात येत असून सांस्कृतिक कलादर्शन, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, बाजारपेठ, प्रदर्शन व फूड फेस्टिवलकरिता नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध केळवे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून केळवा बीच पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येत असतो. केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ व केळवे ग्रामपंचायतच्या सहकार्याने यंदा १८, १९ ते २० एप्रिलमध्ये ५ वा केळवे बीच पर्यटन महोत्सव भरविण्यात येणार आहे.

सर्वत्र जत्रांचा महोत्सव सुरू असताना सातपाटी येथील तीन दिवसीय जत्रा, हनुमान जयंती रोजी कळवे येथील एक दिवसीय जत्रा व त्यानंतर सर्वांना आकर्षण आहे ते केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे. या महोत्सवाकरिता मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक तसेच गुजरात व सुरतच्या दिशेने देखील मोठ्या प्रमाणात नागरिक या महोत्सवाला भेट देत असतात. केळवे समुद्रकिनारा हे पर्यटनाचे आकर्षण असल्याने गर्दीमध्ये अधिकच वाढ होते. 

पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रमुख नृत्य प्रकार असलेले वारली नृत्य, विविध प्रांतातील नृत्य संगीत यांची मेजवानीसुद्धा आलेल्या पर्यटकांना आकर्षित करते. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात २० हजाराहून अधिक पर्यटक भेट देतात. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये एसटी बस केळवा रोड स्टेशन ते केळवे आणि केळवे ते पालघर रेल्वे स्टेशन पर्यंत ही दिवसभर फेऱ्या सुरू राहणार आहेत.

शंभरहून अधिक स्टॉल 

या महोत्सवात सांस्कृतिक कलादर्शन, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, वस्तूंच्या बाजारपेठ, उद्योगांचे प्रदर्शन यासह फूड फेस्टिवल देखील मोठ्या प्रमाणात भरत असतो. महोत्सवात १०० हुण अधिक स्टॉलची मांडणी करण्यात येत असून यामध्ये मासळी व मांसाहार यासह शाकाहारी पदार्थांची देखील मेजवानी अनुभवण्याकरिता नागरिक येत असतात.

पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करू

पालघर जिल्हा निसर्गरम्य समुद्रकिनारी वसलेला जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी याकरिता केळवे बीज पर्यटन उद्योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पर्यटना विषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी पर्यटनावर खूप काम करायचे आहे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील महिन्यात पर्यटन विकासासंदर्भात बैठक नियोजित करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केळवा बीच पर्यटन महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक येत असून त्या अनुषंगाने पर्यटन उद्योग विकास संघ व ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सोयी सुविधांची काळजी घेतली आहे. मागील वर्षी महोत्सवात पाच कोटीची उलाढाल झाली असून या तीन दिवसीय महोत्सवात देखील नागरिक सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. संजय घरत, अध्यक्ष,  केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संस्था.