गणेशपुरी, हिवाळी येथील लाभार्थ्यांच्या तक्रारी;आदिवासी विकास विभाग व महामंडळा बाबत संताप

वाडा : जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच आदिवासींच्या हक्काच्या खावटीमधून खाद्यतेल (गोडेतेल) आणि मसाला (मिरची पावडर) हडपण्याचा संतापजनक प्रकार घडला असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. गणेशपुरी, हिवाळी येथील लाभार्थ्यांना वाटप करताना हा प्रकार उघडकीस आला.

आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत सध्या खावटी संचिकेचे वाटप सुरू आहे. या वाटपात १२ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली आहे. मात्र प्रत्यक्षात या १२ वस्तूंमधील १ लिटर खाद्यतेल गायब आहे, तर काही लाभार्थ्यांना या किटमधील अर्धा किलो मसाला मिळालेलाच नाही. भिवंडी तालुक्यातील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत गणेशपुरी, हिवाळी परिसरातील आदिवासी कुटुंबीयांना खावटीचे वाटप सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.

राज्याचे आदिवासी विकासमंत्री आणि आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष के. सी. पाडवी यांनी खावटी योजनेअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यांना २००० रुपयांचे सामान आणि २००० रुपये रोखीचे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात असे धोरण अवलंबून यासाठी ४८६ कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता दिली आहे.

खावटी योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांमध्ये मनरेगावरील चार लाख कुटुंबे, आदिम जमातीचे दोन लाख २६ हजार कुटुंबे, पारधी जमातीचे ६४ हजार कुटुंबे, गरजू, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा, भूमिहीन अशी तीन लाख कुटुंबे तसेच एक लाख ६५ हजार वैयक्तिक वनहक्क मिळालेले अशा एकूण ११ लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश आहे.

खावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपयेपर्यंतचा किराणा देण्यात येतो व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. मात्र लाभार्थ्यांना वाटप केलेल्या किराणा सामानातून गोडेतेल व मसाला गायब असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी केला आहे.

ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा कारभार जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयातून चालतो. येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही संपर्क झाला नाही.

आदिवासींच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचे हे पाप आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. – विवेक पंडित, संस्थापक अध्यक्ष, श्रमजीवी संघटना