रमेश पाटील
वाडा : वाडा तालुक्यात तयार केलेल्या संशोधित वाडा कोलम व सुधारित वाडा झिनिया या दोन भाताच्या बियाणांनी राज्याबाहेर उडी घेतली आहे. वाडा तालुक्यातून या बियाणांची ५०० टन विक्री देशातील तब्बल सहा राज्यांमध्ये झाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून वाडा तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांनी मोठय़ा मेहनतीने वाडा कोलम या वाणाचे बीजोत्पादन तयार करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी अलीकडेच कोकणस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन वाडा तालुक्यातील मौजे पालसई येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात भाताच्या विविध वाणांचे बीजोत्पादन करणाऱ्या देशभरातून अनेक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
वाडा कोलम या बियाणाला भौगोलिक मानांकन मिळाल्याने वाडा तालुक्यातील वाडा झिनिया कोलम उत्पादित सहकारी संस्था व वाडा कोलम बहुउद्देशीय शेतकरी सहकारी संस्था या दोन्ही संस्थांनी गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मदतीने वाडा कोलम या सुधारित वाणाचे बीजोत्पादन तयार केले. तयार करण्यात आलेल्या बियाणाला पालघर, ठाणे जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर मागणी तर आलीच, पण राज्यातील नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यांतील हैदराबाद (तेलंगणा), छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून मागणी येऊ लागली आहे.
दरम्यान, वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापुढे भातशेतीमध्ये बीजोत्पादक शेतकरी म्हणून आपले अस्तित्व निर्माण करावे, अशी अपेक्षा वाडा कोलम बहुउद्देशीय शेतकरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठाकरे यांनी व्यक्त केली. तर वाडा झिनिया कोलम उत्पादित सहकारी संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतली आहे, असे सांगितले आहे.
शासनाच्या दरापेक्षा जास्त दर देण्याची तयारी
वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादन केलेल्या वाडा कोलम व वाडा झिनिया या दोन्ही वाणांच्या भाताला शासनाच्या दरापेक्षा दीडपट दर देण्याची तयारी गुजरात राज्यातील मॉम ऑर्गोनिक या कंपनीने दाखवली आहे. यासाठी या कंपनीने कुडूस येथील किरण अॅग्रो या कृषी सेवा केंद्रातून वाडा कोलम व वाडा झिनिया या दोन्ही वाणांचे बियाणे खरेदी करून येथील निवडक शेतकऱ्यांना त्याचे मोफत वाटप केले आहे. या शेतकऱ्यांकडून संबंधित कंपनी ३२०० रुपये प्रति क्विंटल दराने हे भात खरेदी करणार आहे. तशी हमी कंपनीने येथील शेतकऱ्यांना दिली आहे. २०२२-२३ या खरीप हंगामासाठी शासनाने भाताचा दर २०४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. तर या कंपनीने पुरविलेल्या बियाणापासुन उत्पादित होणाऱ्या भाताला ३२०० रुपये प्रति क्विंटल दर देण्याची हमी दिली आहे.
यंदा दोन हजार हेक्टरवर बीजोत्पादन
वाडा कोलम व वाडा झिनिया या दोन वाणांच्या बियाणांची या वर्षी ५०० मेट्रिक टन इतकी विक्री झाली आहे. या दोन्ही वाणांच्या बियाणांची अजूनही मागणी वाढत आहे. या वर्षी वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या दोन्ही संशोधित वाणांची बीजोत्पादन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात २००० हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलम व वाडा झिनिया या दोन वाणांची बीजोत्पादन शेती केली जाणार आहे.