वाडा : तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेली कुडूस येथील नळपाणी पुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून विविध प्रकारच्या कारणांमुळे रखडली आहे. येथील राजकीय कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादामुळे ही योजना रखडल्याचे म्हटले जात आहे.
कुडूसच्या नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन १८ जानेवारी २०१४ मध्ये तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कुडूसची लोकसंख्या ३० हजारांहून जास्त असल्याने, येथील जुन्या नळपाणी पुरवठा योजनेतून सर्व शहराला आणि आजूबाजूच्या नगरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे येथे नव्याने पाणीपुरवठा योजना उभारण्याचे ठरले.
या नवीन योजनेच्या कामाला आठ वर्षांपूर्वीच म्हणजे २०१४सालीच सुरुवात झाली होती. मात्र येथील ग्रामपंचायतीमधील राजकीय हेवेदाव्यांमुळे या योजनेचे काम वेळोवेळी बंद पाडण्यात आले. जागेची अडचण, निकृष्ट काम, वारंवार कामाचे नियोजन बदलणे अशा सगळय़ा अडथळय़ांमुळे रखडलेली ही योजना आता पूर्ण झाली आहे. परंतु विद्युत पुरवठा मीटर जोडणी नसल्याने त्या क्षुल्लक कारणावरून ही योजना सुरू करण्यात आलेली नाही.
सत्ताबदलाचा परिणाम
कुडूस ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नवीन नळपाणी योजना मंजूर करुन आणण्यासाठी त्यावेळी ग्रामपंचायतीच्या सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे मोठे योगदान होते. परंतु या योजनेचे निम्मे काम झाल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस सत्तेत आली. या दोन पक्षांच्या अंतर्गत वादामुळे गेली आठ वर्षे ही योजना सुरू झालेली नाही अशी चर्चा आहे.

या योजनेचे काम पूर्ण झाले आहे, विद्युत पुरवठा जोडणीचे कामही येत्या काही दिवसांत होऊन योजना सुरू करण्यात येईल. – अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कुडूस, ता. वाडा.

Story img Loader