पालघर: पालघर जिल्हा परिषद इमारतीच्या साफसफाईसाठी निधीची तरतूदच केलेली नाही. वेतन न मिळाल्याने सफाईचे कंत्राटी कामगार सोडून गेले आहेत. आता इमारतीची साफसफाई कशी करणार, असा मोठा प्रश्न पडला आहे. सिडकोने जिल्हा परिषद इमारत हस्तांतर केल्यानंतर त्या इमारतीच्या साफसफाईसाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करणे तसेच निधी निश्चित करणे गरजेचे होते. परंतु सिडकोने दिलेल्या एका ठेकेदाराच्या सफाई कामगारांकडूनच इमारतीच्या स्वच्छतेचे व निगा राखण्याचे काम केले जात होते. मात्र त्यांना वेतन देण्यासाठी पैसेच नव्हते. सुमारे दोन महिने वेतन रखडल्याने कामगार नोकरी सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे इमारतीच्या सफाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सफाई कामगारांच्या वेतनाचा मुद्दा सोडवण्यासाठी बांधकाम विभागानेच नियोजन करण्याची गरज आहे, असे म्हटले जाते. परंतु बांधकाम विभागाला याची काहीच माहिती नाही. त्यांनी या बाबीचे खंडन केले आहे. बांधकाम विभागाअंतर्गत ही बाब येत नसल्याने आम्ही खर्च का करावा? तसेच त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध कशी करणार? असा सवालच या विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर आठ ते दहा कंत्राटी कामगार इमारतीची सफाई करत होते. त्यासोबत एका सुरक्षारक्षकाचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी यासाठी कंत्राटदाराकडे तगादा लावला, परंतु जिल्हा परिषदेकडून या कामांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने ठेकेदाराला तो मिळत नव्हता. परिणामी, त्याने या कामगारांचे वेतन रखडवले. दोन महिने वेतनाविना काढल्याने कंटाळून सफाई कामगार निघून गेले आहेत. आता केवळ दोन-तीन सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. अर्थात तीन मजली इमारतीची निगा राखण्यास ते पुरेसे नाही.
या कामावर निधीची तरतूद झालेली नाही. ती झाल्यानंतर बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातून हा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा आहे-संघरत्ना खिलारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग