लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : पश्चिम रेल्वेचे नवली (पालघर) येथील रेल्वे फाटक कायमचे बंद करण्यात आले असून या फाटकाच्या वर उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उड्डाणपूलावरून उतरणारा रस्ता हा पालघर ते सत्र न्यायालय या मार्गाच्या चौकात मिळत असल्याने अपघाताची शक्यता पाहता पालघर कडून येणाऱ्या वाहनांना वळसा घालून प्रवास करणे आवश्यक होणार आहे.
नवली भागातून आरंभ होणाऱ्या या उड्डाणपुलाच्या पश्चिमेला उतरणारा पोहोच रस्ता लोकमान्य नगर भागातील पोलीस कॉलनीच्या पलीकडे जुन्या रस्त्याला जोडला जात आहे. विशेष म्हणजे पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाल्यापासून पालघर कडून सत्र न्यायालय व बिडको औद्योगिक वसाहतीकडे जाणारी अधिकतर वाहने या पूलाच्या संपण्याच्या ठिकाणी जोडली जात आहे. हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे बदल न झाल्यास पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांकडून धडक बसून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे या पुलाच्या आखणीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पोपट चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता या पुलाची आखणी फार पूर्वी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या चौकात संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुलाचा दक्षिणेच्या मार्गीकेच्या काही अंतरापर्यंत विस्तार करणे आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत पालघरकडून सत्र न्यायालय व बिडको औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांना पंचायत समिती परिसरात पूलाला असणाऱ्या बोगद्यातून वळसा घेणे आवश्यक ठरेल अशी त्यांनी माहिती दिली. पुलावरून येणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार असून सावधगिरीची उपाययोजना म्हणून लुकलुकणारे दिवे (ब्लिंकिंग लाईट) बसवण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
उंचीनुसार पुलाचा उतार
पुलाच्या प्रत्येक बाजूला तेथील रस्त्यांच्या तुलनेत असणाऱ्या उंचीच्या अनुसार उतार ठरलेल्या प्रमाणात (१:३०) निश्चित करण्यात येत असून त्या अनुषंगाने पूर्व व पश्चिम भागातील पोहोच रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. रेल्वे व उभारण्यात आलेल्या इतर सर्व पुलांच्या प्रमाणे या पुलाची रुंदी देखील साडेसात मीटर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जून अखेरीस नवली उड्डाणपुलावरून वाहतुकीची शक्यता
नवली रेल्वे फाटकाच्या वरच्या भागात धनुष्य आकाराचा स्टील गर्डर बसवण्यात आला असून रेल्वेकडून एक खांब उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण होणे अपेक्षित असून दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका प्रलंबित गर्डरचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. मे अखेरीपर्यंत ही कामे पूर्ण झाल्यानंतर या पुलावरचा अखेरचा स्लॅब जूनच्या मध्यावर टाकण्याचे नियोजित असून त्यापूर्वी व सोबत डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काँक्रीट स्लॅबचे मजबुतीकरण (क्युरिंग) पूर्ण होऊन जून अखेरीपर्यंत नवली उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.
उड्डाणपूलामुळे गैरसोय
नवली उड्डाणपुलाच्या पश्चिमेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या भागातील नागरिकाला तसेच लोकमान्य नगर, मोहपाडा या भागात आर्यन शाळेच्या भागातून प्रवेश करावयाचा असल्यास त्यांना सुमारे २०० ते २५० मीटरचा वर्षा घालावा लागणार आहे त्यामुळे या उड्डाणपुलाच्या नियोजनाच्या दरम्यान उड्डाणपुलाच्या पश्चिमेच्या बाजूला असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा व वहिवाटीच्या रस्त्याचा विचार न केल्या गेल्याने नागरिकांना गैरसोळीला सामोरे जावे लागणार आहे