करवंदे, जांभळे, फणसाचे गरे अजूनही बाजारात दाखल नाहीत
वाडा: पावसाळा तोंडावर आलेला असताना करवंदे, जांभळे, फणसाचे गरे, धामणे, आठरुण, रायवळ आंबे या रानमेव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील खवय्यांना अजूनपर्यंत त्याची चव चाखायला मिळालेली नाही. बाजारात हा रानमेवा अजूनही हवा त्या प्रमाणात दाखल न झाल्याने खवय्यांसाठी रानमेवा काही कोस दूरच राहिला आहे.
नुकताच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवेत झालेल्या बदलामुळे करवंदे, जांभळे, आठरुण तसेच जंगलातील अन्य रानमेव्यावर मोठा परिणाम झालेला आहे. उत्पादनात ५० टक्केहून अधिक घट तर झालीच आहे. पण पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बदलत्या वातावरणामुळे ही फळे अजूनही परिपक्व झालेली नाहीत.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक कुटुंबे मे महिन्याच्या अखेरीस जंगलातील परिपक्व झालेली करवंदे, जांभळे, धामणे, तोरणे, आठरुन, रायवळ आंबे अशी अनेक प्रकारची रानफळे शहरी भागात विक्री करून आपला संसारगाडा चालवीत असतात. विशेषत: आयुर्वेदात जांभळांना विशेष महत्त्व असल्याने शहरी भागात जांभळांना खूपच मागणी असते. किलोला दोनशे ते तिनशे रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र यावर्षी कमी उत्पादनामुळे येथील आदिवासींचे अर्थचक्र बिघडले आहे.
रानमेव्या अभावी येथील शेकडो आदिवासी कुटुंबीयांना पावसाच्या तोंडावर मिळत असलेला रोजगार बुडाला आहे. काही दिवसांनंतर हा रानमेवा थोडय़ाफार प्रमाणात उपलब्ध झाला तरी करोनाच्या र्निबधामध्ये शहरी भागात या रानमेव्याची विक्री कशी करायची ही समस्याही येथील रानमेवा विक्रेतांना भेडसाविणार आहे. तसेच पावसाळ्यात या फळांमध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होत असतो, तसेच या फळांची चवही बदललेली असल्याने खवय्यांनासुद्धा बाजारात उशिरा येणाऱ्या या रानमेवा खायला इच्छा होत नाही.
करोनाची महासाथ, त्यातच हवामानातील बदलामुळे या वर्षी जांभूळ, तसेच अन्य जंगलातील फळ उत्पादनात मोठी घट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
– रुपेश भोईर, पास्ते, ता. वाडा
दरवर्षी या हंगामात रानमेव्याचा अस्वाद घेण्यासाठी आम्ही शहरातून गावी येत असतो, पण यावेळी हे उत्पादनच न आल्याने गावी येण्याचे टाळले आहे.
विजय रा. जाधव — ठाणे, मूळ रहिवासी मानिवली, ता.वाडा