वाडा: ऐन उन्हाळय़ात सरबताच्या हातगाडय़ांवर मोठी गर्दी होते. त्यातही लिंबू सरबताला विशेष मागणी असते. यंदा मात्र लिंबाच्या किमती प्रचंड महागल्याने लिंबू सरबताची मागणीही घटल्याचे दिसते. किंमत मात्र वाढलेली आहे. सरबताच्या गारव्याला जणू लिंबाची बाधा झाल्याचेच म्हटले जात आहे.
गेल्या १५-२० वर्षांमध्ये ऊन वाढत आहे. पालघरसारख्या ग्रामीण आणि जंगलाच्या पट्टय़ात इतक्या प्रमाणावर तापमान कधीच गेले नव्हते, असे येथील जुनेजाणते सांगतात. उष्म्याचा तडाखा सर्वच स्तरांतील लोकांना बसत आहे. रोजगारासाठी बाहेर पडणारे मजूर तसेच गाव, पाडय़ांमध्ये लसीकरण किंवा विविध आजारांची सर्वेक्षणे करण्यासाठी, औषधे वाटण्यासाठी फिरस्तीचे काम करणारे आशा कर्मचारी, गट प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी उन्हाळय़ाने हैराण झाले आहेत.
उन्हाची काहिली शमविण्यासाठी अनेक नागरिक हातगाडय़ांवरील लिंबू सरबत, लिंबू पाणी पिताना दिसतात. मात्र लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने हातगाडीवरील थंड पेयांतून लिंबू सरबत जणू हद्दपारच झाले आहे. जिथे आहे, तिथे प्रचंड महाग असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. सध्या बाजारात १० रुपये प्रति नग लिंबाची विक्री केली जात आहे.
गावरान लोणच्याची कामे थांबली
मे महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागातील महिलावर्ग लिंबाचे किंवा कैरीचे गावरान लोणचे करण्याच्या तयारीला लागतात. अनेक महिला बचत गट त्याची विक्रीही करतात; परंतु यंदा लिंबांचे दर वाढले आहेत. शिवाय वातावरणातील अनियमिततेमुळे बाजारात लोणच्याच्या कैऱ्याही फारशा विक्रीला आलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे लोणची घालण्याचे काम हव्या त्या वेगात सुरू झालेले नाही.
लिंबाचे दर भलतेच वाढल्याने यंदा पहिल्यांदाच थंड पेयांतून लिंबाचा वापर बंद केला आहे. – अशोक सिंग, थंड पेय विक्रेता, वाडा