वाडा : वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या उज्जेनी परिसरात बिबटय़ाने दहशत माजवली आहे. गेल्या चार दिवसांत या बिबटय़ाने सहा जनावरांचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
उज्जेनी परिसर हा पूर्णत: डोंगराळ व जंगलाने व्यापलेला भाग असल्याने या ठिकाणी रानडुक्कर, बिबटय़ाचा वावर नेहमीच असतो. सध्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. चार दिवसांपासून उज्जेनी, साखरशेत या भागातील सहा जनावरांची शिकार बिबटय़ाने केली आहे. बिबटय़ाच्या या दहशतीमुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असुन शेतीच्या कामासाठी तसेच जंगलातून मिळणारी जळावू लाकडे, करवंदे, हंगामी फळे आणण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
ठार झालेल्या जनावरांचे पंचनामे करण्यात येत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केली जाईल. – पी. सी. वडमारे, वन परिक्षेत्र अधिकारी, पूर्व, वाडा.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी बिबटय़ाकडून सहा जनावरांचा फडशा पाडला असतानाही वन्य जीव प्राणी संरक्षण विभाग तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी अजूनपर्यंत कुठलीच उपाययोजना केलेली नाही. शेतीच्या कामासाठी उपयोगी असणाऱ्या आमच्या दोन बैलांची शिकार बिबटय़ाने केल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला असल्याचे जयराम बुधर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा