नीरज राऊत
पालघर जिल्ह्यात असलेल्या ४४३ ग्रामपंचायती पैकी ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाच नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या निवडणुकीत सत्ताधारी गटाची झालेली पीछेहाट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बंदरपट्टीतील भागामध्ये कायम राहिलेला प्रभाव हा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
५१ ग्रामपंचायतीपैकी टेंभीखोडावे येथे बिनविरोध निवड झाल्याने तसेच शिलटे येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने प्रत्यक्षात ४९ ठिकाणी निवडणूक झाली. यापैकी महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने विजय संपादन केल्याने भाजपा व शिवसेनेसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>> पालघर: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७२ टक्के मतदान
विक्रमगड, वसई, जव्हार, मोखाडा या तालुक्यात मोजक्या ठिकाणी निवडणूक झाल्याने या निवडणुकीतील निकाल संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र डहाणू व पालघर तालुक्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये झालेले मतदान हे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी पथदर्शक ठरणार आहे.
शिवसेना व भाजपाच्या स्थानीय नेतृत्वामध्ये बदल झाल्याने त्यांच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये यश संपादन करणे गरजेचे असताना त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली नसल्याने त्यांना पक्ष बांधणीसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या या दोन्ही घटक पक्षांतर्गत कुरबुर दिसून आली असून काही ठिकाणी उमेदवारी देण्यावरून वाद निर्माण झाले तर नवीन नेमणुकांमुळे नाराज असलेल्या घटकांनी पक्षाच्या पाठबळावर उभ्या उमेदवारांसमोर स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ताधारी गटाची झालेली पिछेहाट याचे चिंतन करून पुढील रणनीती ठरवणे देखील गरजेचे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदार संख्या मर्यादित असल्याने मतदारांमध्ये पैशाचे वाटप अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये विविध पॅनल कडून पैशाचा पाडण्यात आलेला पाऊस तसेच जातीचे कार्ड वापरण्याचा झालेला प्रयत्न हा आगामी काळासाठी त्रासदायक ठरणार आहे.
हेही वाचा >>> शहरबात : जिल्हा मुख्यालय चिनी मालाप्रमाणे अल्पायुषी?
नगरपालिका क्षेत्रातील निवडणुका अथवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची इतर भागातून होणारी आयात यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत देखील दिसून आले. विशेष म्हणजे १५ ते २० टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आल्याने राजकारणातील कटुनीतीचा वापर झाल्याचे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. मतदार नोंदणी व नाव वगळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा असली तरीही मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत या अर्जांची छाननी करून नंतर निर्णय घेण्यात येतो असा निवडणूक विभागातर्फे केला जाणारा दावा फोल ठरला आहे. तसेच सबळ कारण नसल्यास मतदारांचे नाव वगळण्यात येणार नाही अशी निवडणूक विभागाकडून घेतली जाणारी भूमिका ही कागदावरच राहिल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे वगळण्यात आलेल्या नावांमध्ये काही जेष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने वेगवेगळ्या मतदार केंद्रांवर जाऊन नाव शोधण्याचा त्यांचा प्रयत्न विफल ठरल्याने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली निराशा अनेक ठिकाणी दिसून आली.
निवडणूक विभागाने दुबार नाव वगळण्याची विशेष मोहीम गेल्या काही वर्षात हाती घेतली होती. असे असताना एकाच ग्रामपंचायतमध्ये एका व्यक्तीचे दोनदा नाव आल्याचे व प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने आपल्या पूर्वी इतर कोणीतरी मतदान केल्याचे प्रकार घडले होते. विशेष म्हणजे अनेक उमेदवारांची व राजकीय पुढाऱ्यांची दोन किंवा अधिक ठिकाणी नाव मतदार यादीत असल्याचे दिसून आल्याने निवडणूक विभागाने दुबार नाव वगळण्यासाठी केलेल्या विशेष मोहिमेमध्ये मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटी नंतर कोणत्या गटाचे प्राबल्य पालघर जिल्ह्यात राहील याबद्दल दावे प्रतिदावे केले जात होते. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गट यांचा जिल्ह्यातील प्रभाव कायम असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले आहे.