पालघर जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

पालघर : पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपून नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या जिल्ह्यातील विकास साधून देशात सर्वोत्तम जिल्हा निर्माण करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच नागरिकांनी जिद्दीने व आत्मविश्वासाने काम करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी  केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोतर्फे उभारण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालयअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे हे प्रत्यक्षात उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. या कार्यक्रमाला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढण, खासदार राजेंद्र गावित, इतर लोकप्रतिनिधी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मुंबई लगत विविधतेने नटलेला, नैसर्गिक साधन समृद्धीने संपन्न काहीसा दुर्लक्षित असलेल्या पालघर जिल्ह्याची लवकरात लवकर स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करून जिल्हा मुख्यालयाच्या भव्य-दिव्य वास्तूमध्ये अधिकारी वर्गाने लोकांच्या समस्या व कामे सोडवण्यासाठी जीव ओतून काम करून या वास्तूला सजीव करण्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला आवाहन केले. अधिकारी वर्गाने  चांगली कामे करून या वास्तूची कीर्ती पसरवावी, असे मुख्यमंत्री यांनी सूचित केले. जिल्ह्यचा विकास साधण्यासाठी तसेच देशात  सर्वोत्तम जिल्हा बनण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, ना. दादा भुसे, ना. दिलीप वळसे पाटील, ना. एकनाथ शिंदे व ना. बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी विविध संकल्पना मांडल्या. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू न शकल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हळहळ व्यक्त केली. या कार्यक्रमांना पालघर शहरातील प्राणवायू प्रकल्प, वसई- विरार महानगर पालिका क्षेत्रातील माता बाल रुग्णालय, नालासोपारा येथील रुग्णालय अचोले येथील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तसेच नालासोपारा- विरार जोडणारा लिंक रोडचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेने वेब पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करून विविध योजनांचे सादरीकरण केले.

‘मुख्यमंत्र्यांचा दौरा वेळोवेळी व्हावा’

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानिमित्त पालघर-बोईसर रस्ता तसेच पालघर-मनोर रस्त्यावरील खड्डे भर पावसात बुजवण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम घोषणा अधूनमधून झाल्यास जिल्ह्य़ातील रस्ते सुस्थितीत राहतील, अशी उपहासात्मक मागणी नागरिकांनी केली.

मुख्यमंत्री व इतर मंत्रीगण हे बोईसर येथे हेलिकॉप्टरने उतरून पालघर येथे वाहनांनी येणार होते. या निमित्ताने पालघर- बोईसर रस्त्यावर असणारे सर्व खड्डे कोसळणाऱ्या पावसात बुजविण्यात आले. तसेच पावसातच अनेक ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले.  पावसाळ्याच्या हंगामात या रस्त्याची झालेली दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नव्हती. परिणामी लोकांना खड्डय़ातून प्रवास करणे भाग पडत होते.  जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण समारंभाच्या निमित्ताने पालघर-बोईसर रस्ता, पालघर-मनोर रस्ता तसेच पालघर शहरातील रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण अग्रक्रमाने हाती घेतले, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्याबद्दल नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

वसई-विरारसाठी कोणतीच घोषणा नाही

वसईतील रुग्णालयांचा लोकार्पण कार्यक्रम गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत पार पडला. मात्र आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी वसई-विरारसाठी कुठलीच घोषणा केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात शहरावर लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. सत्ता आली तर वसई-विरारचा कायापालट करू, असे ते आपल्या भाषणात सांगत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा हा वसई-विरारमधील पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. त्यामुळे मुख्यमंत्री वसई-विरारबद्दल काहीतरी बोलतील, काही घोषणा करतील, अशी अपेक्षा होती.

त्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा द्या -उपमुख्यमंत्री

नागरिकांनी कार्यालयात येण्याऐवजी अधिकारी वर्गाने त्रस्त असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. ज्या श्रमिक व करदात्यांच्या पैशातून जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले आहे त्यांच्या घामाचा सुगंध परिसरात पसरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  जिल्ह्यतील पदाधिकारी ज्या पद्धतीने प्रश्न सोडवतील त्यावर या इमारतींचा लोकाभिमुखपणा व सौंदर्य वाढेल असे सांगून अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाने पर्यटन, आदिवासी विकास यांच्यासह जिल्ह्यतील विकास कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या.

पालघर जिल्हा मुख्यालयाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Let develop preserving cultural natural heritage ssh
Show comments