डहाणू: डहाणू तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक देण्यास टाळाटाळ करणे, अधिक पैशाची मागणी करणे आणि बळजबरी आपल्या दुकानातून मुद्रंकावर मजकूर छापून घेण्याची सक्ती केली जात असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी दुय्यम निबंधक यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या एका पत्रानुसार एका विक्रेत्याचा मुद्रांक विक्री परवाना तात्पुरता रद्द केला असून एका विक्रेत्यास नोटीस बजावण्यात आली आहे.

डहाणू तालुक्यात तीन अधिकृत मुद्रांक विक्रेते असून या विक्रेत्यांकडून नागरिकांना मुद्रांक तसेच कोर्ट फी स्टॅम्प देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दुय्यम निबंधक डहाणू यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार मुद्रांक विक्रेत्यांच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून त्यांच्याकडून कामामध्ये कुचराई केल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. तर तहसीलदार तलासरी यांनी एका मुद्रांक विक्री केंद्राला भेट दिली असता विक्रेता वेळेवर दुकानात हजर नसल्याचे आढळून आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पालघर यांनी एका विक्रेत्यांचा परवाना तात्पुरता रद्द केला असून एका विक्रेत्याला समज देण्यात आली आहे.

या विषयी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांनी याविषयी खुलासा दिला असून त्यांच्या म्हणण्यानुसार डहाणू आणि तलासरी तालुक्यात १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून कामे सुरळीत पणे सुरू असल्याची खात्री त्यांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी मुद्रांक देताना विक्रेत्यांकडून नागरिकांना मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Story img Loader