सूर्या नदी तीरावरील ग्रामस्थांच्या नशिबी आजही बोटीचे हेलकावे; प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष

नितीन बोंबाडे

डहाणू : धामणी धरणाच्या उशाला वसलेल्या डहाणू तालुक्यातील कोशेसरी भवाडी, विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक, सोलशेत बेटावरील गावांना जोडणाऱ्या सूर्या नदीवर  पूल बांधण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील गावकरी विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिलांना अद्याप बोटीनेच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.  सूर्या नदीवर पूल नसल्याने डहाणू तालुक्यातील गावकरी अद्याप कोशेसरी ते सोलशेत, कवडास, कासा बुद्रुक, कोशेसरी ग्रामस्थ बोटीनेच करत आहेत. लवकरात लवकर सूर्या नदीवर पूल  बांधावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

डहाणू तालुक्यातील असंच एक दुर्गम गाव म्हणजे कोशेसरी भवाडी परिसर. कोशेसरी  हे गाव धामणी नदीच्या काठावर आहे. धामणी धरणाचा विसर्ग या नदीतून होत असल्याने  नदीचे पात्र अफाट आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका या गावाला बसतो. गावातून दोन्ही तालुके सुमारे ८०  कि.मी अंतरावर आहेत. मुलांना शिक्षण द्यायचे तर गावात बस येत नाही. अशावेळी बोटीतून पलीकडे किनाऱ्याला उतरायचे आणि तीन कि.मी.अंतर चालत जाऊन तेथून खासगी वाहनाने पुढचा प्रवास करावा लागत आहे. गावकरी आपल्या जीवाची पर्वा न करता रोज हा जीवघेणा प्रवास करत आहेत.

सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या अलीकडे डहाणू तालुक्यातील कोशेसरी भवाडी आणि पलिकडे विक्रमगड तालुक्यातील सोलशेत गावात अद्याप ब्रिटिशकालीन राजवटीप्रमाणे बोटीने प्रवास सुरू आहे. कोशेसरी भवाडी  ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून येथील ग्रामस्थांना शिक्षण तसेच रोजगारासाठी नदी मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तर विक्रमगड  तालुक्यातील सोलशेत बेटाचीही हीच अवस्था आहे. शाळकरी विद्यार्थी, रोजगार, आरोग्याच्या समस्यांसाठी सूर्या नदी ओलांडण्यासाठी लाकडी होडीचा वापर करत कोशेसरी ते सोलशेत असा १५० मीटर अंतर बोटीचे हेलकावे खात पार करावे लागत आहे.

लवकरात लवकर सूर्या नदीवर पूल बांधावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेले आदिवासींचे हाल मात्र स्वातंत्र्यानंतरही कायम आहेत. धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग झालेले पाणी सूर्या नदीतुन वाहून नेले जाते. सूर्या नदीने कोशेसरी व सोलशेत येथे डहाणू आणि विक्रमगड तालुक्याच्या सीमा अधोरेखित केल्या आहेत.  सूर्या नदीमुळे डहाणू तालुक्यातील एकूण महसूल गावे २९ व विक्रमगड तालुक्यातील १७ महसूली गावे विभागली गेली आहेत.  

सूर्या नदीवर पूल नसल्याने  सायवन, उधवा, दादरा नगर हवेली, दिवशी, दाभाडी, किन्हवली, सायवनहून गांगोडी, शेणसरी जवळचा प्रवास दळणवळणाच्या सुविधांअभावी तुटलेला आहे. सूर्या नदीवर पूल झाल्यास नागरिकांना तसेच वाहतूकदारांना कमी अंतराचा प्रवास करता येणार आहे.

सूर्या नदीवर पूल बांधण्यासाठी डहाणू तालुक्यातील किन्हवली, दिवशी गडचिंचले, कासा बुद्रुक, सायवन, कोशेसरी, भवाडी या ग्रामपंचायती तसेच विक्रमगड तालुक्यातील तलवाडा, कर्हे-तलावली इत्यादी ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे ग्रामसभेचे  ठराव दिले आहेत.

शैलेश करमोडा, जिल्हा परिषद सदस्य

सूर्या नदीवरील कोशेसरी येथील हा पूल अंदाजे १५० मीटर लांबीचा असून त्याचे मोजमाप घेतले गेले आहे. त्यासाठी अंदाजे ६ कोटींहून अधिक निधी लागणार असून हे काम नाबार्डमध्ये सुचवले आहे.

धनंजय जाधव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, डहाणू

सूर्या नदीवर कोशेसरी येथे दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असून या पुलामुळे दळणवळण वाढून या भागाचा विकास होऊ शकेल. सध्याच्या स्थितीत पुलाअभावी लोकांचे हाल होत आहेत.

स्नेहलता सातवी, सभापती, पंचायत समिती, डहाणू

Story img Loader