कासा : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत या शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन दिवसात २६ हजार बीजगोळे (सिडबॉल) तयार करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
पृथ्वीवरील वृक्षांची विविध कारणांनी वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, तापमानवाढ, असमान पर्जन्यमान अशी नैसर्गिक संकटे निर्माण होत आहेत. या संकटावर एकमेव उपाय म्हणजे पुन्हा एकदा झाडांची संख्या वाढली पाहिजे. निसर्गाचं मुद्दल नाही, पण व्याज तर देऊ, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत डहाणू तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा या शाळेत पर्यावरण रक्षणासाठी बीजगोळे उपक्रम राबवण्यात आला.
सीडबॉल्स म्हणजेच बीजगोळे. बियाणे, चिकणमाती आणि माती अथवा खताच्या लहान गोळ्यांमध्ये बियाणे करून बीजगोळे तयार केले जातात. नांगर किंवा इतर शेती उपकरणांनी जमीन तयार न करता बियाण्यांपासून झाडे वाढवण्याची ही जुनी पद्धत आहे. जरी बियाणे गोळे प्राचीन काळापासून अस्तित्वात असले, तरी १९३० च्या सुरुवातीला गुरिल्ला गार्डनिंग चळवळीद्वारे ते केवळ फेकून गुप्तपणे वनस्पतींचा प्रसार करण्यासाठी पुनरुज्जीवित केले गेले. जपानी सेंद्रिय शेतकरी आणि तत्त्वज्ञानी मासानोबू फुकुओका यांना सीडबॉलच्या जीर्णोद्धार आणि आधुनिक काळातील लोकप्रियतेचे श्रेय मोठ्या प्रमाणावर दिले जाते. चिकणमाती, माती आणि बियाणे उपलब्ध असलेल्या जगात कोठेही कोणीही गुंतवणूक न करता सिडबॉल बनवू शकतो. तयार केलेले सिडबॉल पाऊस सुरू झाल्यानंतर उजाड जनिमीवर तसेच जंगलात टाकले की बी रुजून वृक्षारोपण न करता झाडे वाढायला सुरवात होते. डहाणू तालुक्यातील लिलकपाडा शाळेने तीनच दिवसात २६ हजारापेक्षा जास्त सिड बॉल म्हणजेच बीजगोळे तयार केले आहेत.
२०२२ पासून दीपक देसले गुरुजी यांनी घोलवड च्या टोकेपाडा शाळेत बीजगोळे उपक्रमाची सुरवात केली होती. २०२२ मध्ये त्यांनी १० हजार बीजगोळे तयार केले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर शाळांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. गेल्यावर्षी तालुक्यातील शाळांमध्ये आपटा, बेहडा, रिठा, गुंज, साग, बोर, लाजरा, करंज अशी विविध भारतीय हवामानात वाढणाऱ्या वृक्षाची लाखो बीजगोळे तयार केले आहेत.
यावर्षी पाच लाख बीजगोळे निर्मितीचे लक्ष
दीपक देसले यांनी सुरू केलेल्या बीजगोळे उपक्रमाला राज्यभरातील शाळांकडून स्वेच्छेने प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी एक लाखांपेक्षा अधिक बीजगोळे तयार केल्यानंतर विविध माध्यमांनी त्याची दखल घेतली होती. यावर्षी राज्यभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये बीजगोळे निर्मितीसाठी बियाणे पुरविले जाणार असून पाच लाख बीजगोळे तयार करण्याचे लक्ष ठेवले असून राज्यातील विविध भागात वृक्षलागवडी साठी हे बीजगोळे वितरित केले जाणार आहेत. बीजगोळे निर्मितीसाठी आवश्यक बियांचा पुरवठा करण्यासाठी वैशाली पाटील, अवधूत नगरकर यांनी सुद्धा सहकार्य केले.