पालघर : इमारत कोसळून जीवितहानी होऊ नये या दृष्टीने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषद क्षेत्रातील अतिधोकादायक, धोकादायक व रचनात्मक दुरुस्ती अशा ८९ इमारतींची यादी नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नगर परिषडेच्या जुन्या इमारतीसह टेलिफोन कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, शाळा व व्यापारी संकुलांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी इमारत कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी पालघर नगरपरिषदेतर्फे अति धोकादायक व राहण्यास अयोग्य ४९ इमारती, संरचनात्मक दुरुस्ती प्रवर्गात मोडणाऱ्या २५ इमारती तसेच इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गातील १५ इमारती अशा एकूण ८९ इमारतींची यादी वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली. अतिधोकादायक राहण्यास अयोग्य इमारती त्वरित निष्कासीत करून त्यावर कारवाई करण्यास नगरपरिषदेतर्फे प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत नगरपरिषदेकडून कायद्यातील नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करण्यास प्रारंभ केला आहे.
नगर रचना विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातील धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. अजूनही धोकादायक इमारती कुठे आहेत का याचे सर्वेक्षण नगररचना विभाग करत आहे. तसेच मागील वर्षीच्या स्थळ पाहणी सर्वेक्षणातून ज्या इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या किंवा तपासणीनंतर काही बदल करण्याचे सुचविले होते ते काम पूर्ण झाले की नाही याची देखील तपासणी या सर्वेक्षणात सुरू आहे.
धोकादायक असलेल्या इमारतींना नगरपरिषदेकडून पुढील दहा दिवसात नोटीसा बजविण्यात येणार आहेत. त्यानंतर अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी लवकरात लवकर इमारती खाली कराव्यात, ज्या इमारती धोकादायक व संरचनात्मक दुरुस्तीच्या आहेत त्यांच्या मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते नगर परिषदेकडे सादर करावे. ज्या इमारती स्वखर्चाने स्ट्रक्चरल ऑडिट नाही करणार त्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट नगरपरिषदे कडून करण्यात येईल व त्यानंतर त्याचा मोबदला तेथील मालकाकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
कोणकोणत्या इमारती धोकादायक
राहण्यास अयोग्य अशा ४९ इमारतींच्या यादीत प्रामुख्याने नंदाभुवन, कमलापार्कमधील लक्ष्मीदर्शन, लक्ष्मीकृपा, लक्ष्मीप्रिया, लक्ष्मीछाया, विजयनगर या इमारती, रेल्वेस्टेशनसमोर नॅशनल ज्वेलर्सची इमारत, ब्रुजवासी हॉटेलची इमारतींचा समावेश आहे. या यादीमध्ये पालघर रेल्वे स्टेशन समोरील पालघर नगरपरिषदेची पूर्वीची इमारत, पालघर नगरपरिषदेच्या मालकीची आणि विद्यमान बीएसएनएल कार्यालय असलेली इमारत, आरोग्य पथक-माता बाल संगोपन केंद्र, श्रीरामनगर येथील इमारत, जिल्हा परिषद एस. एम. मराठी मिशन शाळा या शासकीय इमारतींचा समावेश आहे. इमारती रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करण्यायोग्य २५ इमारती असून इमारती रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असणाऱ्या १५ इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीचे काय
गेल्या अडीच तीन वर्षापासून नगरपरिषदेची इमारत स्थलांतरित झाली असून यापूर्वी नगरपरिषद कार्यरत असणारी इमारत शहरातील अतीधोकादायक इमारत असल्याचे दिसून येत आहे. ही इमारत आता रिकामी केली असली तरीही पालघर स्टेशन जवळील भाजी बाजारात ही इमारत आहे. या इमारतीच्या चोहोबाजूने गाळे, भाजी विक्रेत्यांसह इतर दुकानदार बसलेले असतात. तसेच दिवसभर या बाजारात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे ही जीर्ण झालेली ही इमारत जर कोसळली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे म्हणणे अति धोकादायक राहण्यायोग्य व तात्काळ निष्कासित करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या इमारतींना नोटीस बजावून इमारत निष्कासित करण्यात येईल.इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करण्या प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य राहील. जर मालक, भाडेकरू यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही तर नगर परिषदेला स्ट्रक्चरल ऑडिओ करण्याची मुभा राहील. धोका आटोकात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना स्वखर्चाने कराव्यात, तसे न केल्यास इमारतीला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित मालकावर राहील.
धोकादायक इमारतींमुळे कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून इमारत मालकांना नोटिसा बजावत त्या खाली करण्याचे आदेश दिले जात आहेत. अति धोकादायक इमारत धारकांनी आपले घर खाली करून नगर परिषदेला सहकार्य करावे. नोटिसा दिल्यानंतर देखील घर खाली किंवा दुरुस्त न केल्यास या इमारतीमुळे काही अपघात झाल्यास याला येथील रहिवासी जबाबदार राहतील. तसेच नगरपरिषदेच्या जुन्या इमारती जवळ असलेल्या दुकानदारांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. – अजय संखे, नगर रचना विभाग पालघर