विजय राऊत

छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या तळागाळातील आदिवासी महिलांचे अर्थकारण ठप्प

कासा: तळागाळाच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महिला बचत गटांनादेखील टाळेबंदीच्या कालावधीत मोठा फटका बसल असून त्यांचे अर्थकारण ठप्प झाले आहेत. याचा परिणाम अनेक आदिवासी कुटुंबांवर झाला असून अशी कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडली आहेत.

पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यत अनेक आदिवासी महिला ‘उमेद’ ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग व्यवसाय करत आहेत. जव्हारमध्ये २१९६, विक्रमगडमध्ये १८१९ तर मोखाडामध्ये १४०१ बचत गट कार्यरत असून अनेक आदिवासी महिलांना आधार असणाऱ्या महिला बचत गटांना गेल्या एक वर्षांपासून टाळेबंदीचा फटका बसत आहे. विविध छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आदिवासी महिलांचे अर्थकारण ठप्प झाले आहे.

टाळेबंदीपूर्वी काही महिला बचत गटाला पापड उद्योगातून सुमारे दीड लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत होते तर उन्हाळी लोणच्याचा हंगामात तब्बल एक लाखा पर्यंत उत्पन्न मिळत होते. बचत गटांच्या माध्यमातून या महिला लोणचे, पापड, मुहाचे लाडू, मसाले, नागली, पापड, तांदूळ पापड, कुरडया, आबांचे लोणचे, हातसडीचा तांदूळ, डाळ, कडधान्य, मोगरा, भाजीपाला, बाबूंचे वस्तू, वारली पेंटींग, कापडी मास्क, घरगुती खानावळ, इत्यादी महिला बचत गट व्यवसाय करत असतात. या उद्योगांमुळे या महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळते. परंतु गेल्या एक वर्षांपासून या टाळेबंदीमुळे या महिलांच्या उद्योगात खंड पडला आहे.

अनेक महीलांसाठी उत्पन्नाचा एकमेव असणारा मार्ग बंद झाला आहे. विविध पदार्थ बनविण्यासह विविध व्यवसायांद्वारे अर्थकारणाची घडी बसविणाऱ्या महिला बचतगटांच्या प्रगतीचे चाक थबकले आहे. जागोजागी भरविण्यात येणारी प्रदर्शने आणि मोठय़ा पुरवठादार व्यापाऱ्यांकडून या वस्तूंना मोठय़ा प्रमाणावर मागणीदेखील असते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी घोषित केल्यानंतर बहुतांश बचतगटांचे काम ठप्प झाले आहे.

मसाले बनविणे किंवा वाळवणाचे पदार्थ बनविण्यासाठी उन्हाळ्याचा काळ महत्त्वाचा असतो. मात्र, संचारबंदीमुळे लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसल्याने ही कामेदेखील ठप्प झाली आहे. सोबतच बाजारपेठाही पूर्ण बंद असल्याने मोठे व्यापारी व घरगुती ग्राहकांकडूनदेखील नवीन मागणी नाही. त्याचा मोठा परिणाम बचतगटांच्या अर्थकारणावर होत आहे.

एक वर्षांपासून कर्जाचे दडपण

जव्हार तालुक्यातील मेढा गावातल्या शारदा महिला बचत गटाने तब्बल १०० किलो आंब्याच लोणचे बनवले आहे. परंतु त्याच्या मालाला बाजारपेठ नसल्याने ते कितेक दिवस तसेच पडून आहे, त्यामुळे या गटाला मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी या महिला बचत गटाच्या माध्यमातून लोणचे, मसाला पापड असे पदार्थ तयार करून घरगुती उद्योग करत आहेत. जिल्ह्यत अनेक आदिवासी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून आपला उदनिर्वाह करत आहेत परंतू मागील एक वर्षां पासून या महिलांची परिस्थिती बिकट झाली आहे. उद्योग व्यवसाय साठी घेण्यात आलेला कर्ज फेडण्यासाठी गत एक वर्षांपासून कोणताही मार्ग नाही. त्यामुळे या महिलांवर आर्थिक दडपण आले आहे.

आम्ही महिला बचत गटा मार्फत आंब्याचे लोणचे व उडदाचे पापड बनून जव्हार, मोखाडा व विक्रमगड परिसरातील हॉटेल मालकाने विकत होतो. परंतु या वर्षीच्या कडक टाळेबंदीमुळे हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आमचा माल विकला गेला नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

सुमित्रा मिसाळ, शारदा महिला बचत गट, मेढा (जव्हार)

महिला बचत गटाने ज्या विविध वस्तू तयार केल्या आहेत त्याबाबत योग्य तो आढावा घेऊन त्या वस्तुंची ऑनलाईन विक्री करण्याविषयी नियोजन करण्यात येणार आहे.

– समीर वाठाकर, गटविकास अधिकारी, जव्हार