कासा : शेतकरी सन्मान योजना निधी, खावटी अनुदान, कृषी खात्याची अनुदाने, निराधार योजनांची अनुदाने, शिष्यवृत्ती अशी विविध प्रकारची सरकारी अनुदाने काढण्यासाठी कासा येथे सरकारी बँकेसमोर मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग पाहावयास मिळते आहे. डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पेरणीची ८०%कामे आटोपली असून काही दिवसात रोपणीला सुरुवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेत उखळणीची कामे करून ठेवली आहेत. पण या दिवसात शेतकऱ्यांना मोठा खर्च होत असतो, बी बियाणे, खते, नांगरणीसाठी पॉवर टिलर करण्यासाठी हाती पैसा लागतो. अशा वेळी सरकारी अनुदानांचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होत असतो.
वेगवेगळय़ा शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. कासा चारोटी परिसरातील ३० ते ४० गावांसाठी आणि शेकडो पाडय़ांसाठी कासा येथे एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेच्या शाखेमध्ये साधारणपणे पन्नास हजारांवर खाती आहेत. मात्र येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे खातेदारांना आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी अडचणी येतात. या बँकेत चार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. वेगवेगळय़ा अनुदानाच्या जमा झालेल्या रकमा काढण्यासाठी ग्राहक सकाळी सहापासूनच बँकेबाहेर रांगा लावायला सुरुवात करतात. बँक सुरू होण्याच्या वेळेपर्यंत बाहेर जवळपास मोठी गर्दी जमलेली असते. बऱ्याच ग्राहकांकडे एटीएम कार्ड नाही. त्यामुळे अगदी पाचशे ते हजार रुपयांसाठीही त्यांना बँकेच्या रांगेत उभे राहावे लागते. अनेकदा बँकेतील इंटरनेट कनेक्शन बंद पडून बँकेचे व्यवहार बंद पडतात. त्यामुळे मग अनेकदा रांगेतील अनेक ग्राहकांना पैसे न काढताच रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. बँकेने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून ग्राहकांना जलद सेवा मिळेल अशी मागणी करण्यात येत आहे. याविषयी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.