वादळग्रस्त भागांच्या सर्वेक्षणाचा घोषवारा आठवडाअखेरीस शासनाकडे; सर्वाधिक कृषी क्षेत्राला फटका

पालघर : अरबी महासागरात १७ व १८ मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका पालघर जिल्ह्यला बसला आहे. प्रत्यक्षात जिल्ह्य़ात २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असा अंदाज  व्यक्त केला जात असून यामध्ये कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. परंतु  सर्वेक्षणानुसार  सुमारे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.   वादळग्रस्त भागांच्या सर्वेक्षणाचा घोषवारा  आठवडाअखेरीस शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे १७ व १८ मे रोजी प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यत अनुक्रमे २९८ मिलिमीटर व १९८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद  झाली होती. मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये दोन जणांचा समावेश आहे.  या खेरीज जिल्ह्यतील आठ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आली आहे. चक्रीवादळात अंशत:  पडझड झालेल्या घरांची संख्या १३ हजार १९९ वर पोहोचली असून ८९ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याखेरीज ३४० सार्वजनिक मालमत्तेची अंशत: पडझड झाली आहे. ७२२ झाडे पडल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे.

चक्रीवादळामुळे ९०९ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.  १०९२ विद्युत खांबांची पडझड होऊन पालघर महावितरण विभागात पाच कोटी ३४ लाख रुपये तर वसई विभागात तीन कोटी ७२ लाख रुपयांची असे एकंदरीत नऊ कोटी सहा लाख रुपयांचे नुकसान महावितरणला सोसावे लागले. मच्छीमारांच्या २५ बोटींचे पूर्णपणे नुकसान झाले असून २८ बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. या खेरीज २२९ जाळ्यांचे नुकसान झाले आहे.  निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने या सर्व नुकसान बाधितांना वाढीव रक्कमेने भरपाई देण्याचे जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार केले आहेत.

जिल्ह्यतील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रफळावरील चिकू बागायती तर दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी भाताचे नुकसान झालेले आहे. या चक्रीवादळात फळपिकांचे चार हजार १०० हेक्टर तर शेतपिकांचे १९०० हेक्टर असे सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बहुवार्षिक पीक (फळ) झाडांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे अंशत: नुकसान झालेल्या बोटींना १० हजार रुपये तर पूर्ण नुकसान झालेल्या बोटीना पंचवीस हजार रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. घरांच्या झालेल्या नुकसानीच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई देण्याचे शासनाच्या मार्गदर्शन सूचना आहेत.  नुकसानीचा घोषवारा शासनाला आठवडा अखेरीस दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

कृषीक्षेत्रात मोठे नुकसान

चक्रीवादळात कृषी क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले असून उन्हाळी भाताचे १३९० हेक्टर, केळी पीक ३८१ हेक्टर तर पपईचे साडेदहा एकर असे ४४३८ शेतकऱ्यांची १९३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ९११० बहुवार्षिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची ४११७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून त्यापैकी आंबा १३४० हेक्टर, चिकू २३१९ हेक्टर व इतर फुल पिके व फळपिके ४५८ हेक्टरचा समावेश आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यतील १४ हजार ३४८ शेतकऱ्यांची ६०५७ हेक्टर क्षेत्रावर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. सुमारे दहा कोटी रुपयांचे हे नुकसान  असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो.

Story img Loader