पालघर/ कासा : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी डावलल्याने वनगा कालपासून नैराश्यामध्ये असून ते आत्महत्या करण्याच्या विचाराधीन आहेत. आमच्या प्रामाणिकपणाचे हेच फलित आहे का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.

पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारताना निवडून येण्याची क्षमता नसल्याचे तसेच सर्वेक्षणात नकारात्मक निकाल मिळाल्याचे त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले होते. अशावेळी भाजपामधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन गावीत त्याला उमेदवारी देण्यात आली होती.

हेही वाचा >>> हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद

राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यावेळी डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला.

गेल्या दोन दिवसांपासून श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांशी संपर्क साधताना रडत आपली फसवणूक झाल्याचे मांडले होते. आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून उमेदवारी च्या निर्णयात बदल होईल अशी त्यांना आशा वाटत होती.

हेही वाचा >>> ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

आज सायंकाळी आपल्या घरी पत्रकारांशी श्रीनिवास वनगा यांनी आपली व्यथा मांडली. आपण मतदार संघात निवडून येणार नाही असे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगण्यात आल्याचे कथन केले. तरीदेखील पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी आपण प्रामाणिकपणे काम केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यमान आमदारकीच्या कारकीर्द मतदार संघात अनेक विकास काम केली असताना देखील आपल्याला या पद्धतीचे फलित मिळत असल्याने त्यांनी साश्रू नयनांनी आपल्याला डावल्याच्या भावना व्यक्त केल्या.

वनगा यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फसवलं, उद्धव ठाकरे सारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ही त्यांची घोडचूक होती. माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार गुवाहाटीला गेले. मात्र माझ्याच पतीला का फसवलं असा सवाल श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला आहे. ४० पैकी ३९ आमदारांना तिकीट दिलं मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला असा प्रश्न उपस्थीत केला असून कवाडा येथे वनगाच्या राहत्या घरी पत्रकार परिषदेत वनगा कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

पक्षफुटी दरम्यान वनगांचे होते सहकार्य …

आपल्या वडिलांचे जानेवारी २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याची चाहूल लागल्याने श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून होते. शिवसेना पक्षात फूट पाडून सुरतला मोजक्या आमदारांसह निघताना श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण इतरांना सांगण्यात आले होते. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे सातत्याने एकदा शिंदे यांच्यासोबत राहिले होते. शिवसेना (शिंदे) पक्षातील ठाणे येथील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आरंभी पासून यापुढे तुला तिकीट दिले जाणार नाही असे त्यांना निक्षून सांगत असल्याची माहिती श्रीनिवास वनगा यांनी अनेकदा सहकाऱ्याना दिली होती. पक्षाशी तसेच मुख्यमंत्री यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची सध्या चर्चा आहे.