कासा : देशभरात २०१९ पासून टोल नाक्यावरील गर्दी कमी व्हावी व वेळ वाचावा यासाठी फास्टटॅग प्रणाली अस्तित्वात आणण्यात आली. एक एप्रिल २०२५ पासून ही प्रणाली वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. फास्ट-टॅग सक्ती केल्याने राज्यात अनेक टोल नाक्यांवर गर्दी होत असली तरी राष्ट्रीय महामार्गवरील चारोटी टोल नाक्यावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे.

फास्ट टॅग प्रणालीला सुरुवातीला वाहनचालकांकडून विरोध करण्यात येत होता. परंतू टोल नाक्यावर आर्थिक देवाण-घेवाण करताना वाया जाणारा वेळ वाचत असल्याने सरकार कडून फास्ट-टॅग प्रणाली सक्तीची करण्यात आली होती. वेळोवेळी त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. फास्ट-टॅग प्रणालीची सक्ती करू नये यासाठी काही वाहनचालक-मालक संघटना न्यायालयात सुद्धा गेल्या होत्या परंतू न्यायालयाने या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्यामुळे आता एक एप्रिल पासून फास्ट-टॅग सक्तीचा करण्यात आला आहे. फास्ट-टॅग यंत्रणा नसल्यास वाहनचालकांना दुप्पट दराने टोल द्यावा लागणार आहे.

चारोटी टोलनाक्यावरून दररोज साधारणपणे लहान पाच ते सहा हजार तर मोठी नऊ ते १० हजार वाहने अशी एकूण १५ ते १६ हजार वाहने  नियमितपणे प्रवास करतात. टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होऊ नये व वाहनचालकांना जलदगतीने टोल ओलांडून जाता यावा यासाठी दोन्ही बाजूंनी मिळून १४ मार्गिका आहेत. सर्व मार्गिकावर फास्ट-टॅग प्रणाली सुरू आहे.

टोल नाक्यांवर १० टक्केच्या आसपास वाहने विना फास्ट-टॅग ने प्रवास करत होती. परंतू कालपासून दुप्पट दराने टोल वसुली होत असल्याने अनेक वाहन चालक टोल नाक्याजवळील फास्ट-टॅग सुविधा केंद्रावर जाऊन फास्ट-टॅग यंत्रणा बसवून घेत आहेत. त्यामुळे राज्यात इतरत्र टोल नाक्यावर गोंधळ उडाला असला तरी चारोटी टोल नाक्यावर वाहतूक सुरळीत सुरू होती.

यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संपर्क करून फास्ट टॅग नसल्यामुळे झालेल्या दंडात्मक कारवाई विषयी विचारणा केली असता टोल वसुली करणारे एजन्सी मध्ये बदल झाल्याने दंडात्मक रकमेचा तपशील उपलब्ध नसल्याचे लोकसत्ताला सांगितले.

१ एप्रिल पासून फास्ट-टॅग यंत्रणा सक्तीची केली असली तरी योग्य नियोजन आणि वाहनांना टोल नाका ओलांडून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या मार्गिका यामुळे चारोटी टोल नाक्यावर वाहतूक यंत्रणा सुरळीत सुरू होती. फास्ट-टॅग नसणाऱ्या वाहनांमध्ये लहान प्रवासी कारसारख्या वाहनांची संख्याच जास्त होती. – चारोटी टोल नाका अधिकारी