पालघर : राज्य सरकारने पापलेट या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला असून यासह ५४ प्रजातींच्या संवर्धनासाठी लहान माशांची मासेमारी करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आदेश पारित केले आहेत. हे आदेश धुडकावून पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार २० ते ३० ग्रॅम वजनाचे पापलेट मासे मोठ्या प्रमाणात पकडत असून यामुळे आगामी हंगामामध्ये मच्छीमारांना संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. आपले पिल्लांची अशाच प्रकारे पकड पुढील दीड महिना सुरू राहण्याची शक्यता असून मत्स्यव्यवसाय विभागाने याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांचे वार्षिक उत्पन्न पापलेट माशाच्या उत्पादन व त्याला मिळणाऱ्या दरावर बहुतांशी अवलंबून असून गेल्या अनेक वर्षांपासून पापलेट माशाची आवक टप्प्याटप्प्याने कमी झाल्याचे दिसून आले आहे. खवय्यांना आवडणारा हा मासा कालांतराने नामशेष होईल हे ध्यानी ठेवून या वैशिष्ट्यपूर्ण माशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने ४ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकारने पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्याबाबत घोषणा केली.
पारंपारिक मासेमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच आगामी काळात शाश्वत मासेमारी सुरू व्हावी या उद्देशाने राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश जारी करून मासेमारीच्या आकारमानाचे विनियमन जाहीर केले. राज्यातील मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने कमी आकाराचे वजनाचे मासे पकडण्यात टाळण्यासाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था, मुंबई (सीएमएफआरआय) यांनी सुचविलेल्या सुमारे ५४ प्रजातींची किमान कायदेशीर आकारमान जाहीर करून त्याचे उल्लंघन करण्याविरुद्ध कारवाई करण्याचे राज्य शासनाने सूचित केले.
राज्य सरकारच्या या आदेशात पापलेट माशाची परिपक्वतेची किमान आकारमान हे १३५- १४० मिलिमीटर (लांबी) इतके असून त्या लांबीपेक्षा कमी आकारमानाच्या माशांना पकडणाऱ्यां विरुद्ध मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील सातपाटी, झाई, डहाणू, अर्नाळा, वसई तसेच ठाणे जिल्ह्यातील उत्तर येथे २० ते ३० ग्रॅम वजनाचे व ६० ते ७० मिलिमीटर लांबीचे पिल्लावर पकडून बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या लहान पिल्लावळांची राजरोज पणे खरेदी-विक्री होत असताना त्याकडे मत्स्यव्यवसाय विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
पालघर : पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार २० ते ३० ग्रॅम वजनाचे पापलेट मासे मोठ्या प्रमाणात पकडत असून यामुळे आगामी हंगामामध्ये मच्छीमारांना संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे पकड पुढील दीड महिना सुरू राहण्याची शक्यता असून मत्स्यव्यवसाय विभागाने याविरुद्ध ठोस कारवाई… pic.twitter.com/Ml0z6iGTsN
— LoksattaLive (@LoksattaLive) March 31, 2025
लहान पिल्ल्यावर पकडण्याची क्रिया मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झाली असून ती मासेमारी हंगाम संपेपर्यंत सुरू राहील अशी भीती पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारंकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रकार सुरू राहिल्यास आगामी मासेमारी हंगामा मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कवडीमोल दरात होते विक्री
२० ते ३० ग्रॅम वजनाचे पापलेटच्या पिल्लावळाची “टब” निहाय विक्री होत असून १५००- १७०० पापलेट पिलांना सध्या १३००- १५०० रुपयांचा बाजार भाव सुरू आहे. याच पापलेट पिलावयाला मोठ्या आसाची जाळी वापरून सोडून देण्यात आल्यास व त्यापैकी ५० टक्के पापलेट सरासरी २५० ते ३०० ग्रॅम वजनाचे झाल्यास अशा वाढलेल्या माशांच्या बदल्यात किमान तीन लाख रुपये मिळतील असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पापलेटची पिल्लावर पकडण्याच्या कियाईमुळे निर्यातीला फटका बसणार असून परकीय चलन मिळण्यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे.
राज्य सरकारने माशांच्या लहान पिल्लांची मासेमारी करू नये या दृष्टीने आदेश काढल्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना परिपत्रक काढून त्याची माहिती देण्यात आली. मच्छीमारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दोन वेळा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशा लहानपिल्लावळ्यांच्या माशाची खरेदी विक्री करताना आढळल्यास कायद्याने गुन्हे दाखल करण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असून या संधर्भात लवकरच कारवाई आरंभली जाईल. खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिकांना माहिती देणारे फलक लावण्यात येतील.
दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग (ठाणे, पालघर)