बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत रासायनिक कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून आगीची झळ बाजूच्या इतर दोन कारखान्यांना लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील आठ अग्निशमन दलांच्या जवानांचे प्रयत्न सुरू असून सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक के -६ वरील यु.के. अरोमॅटिक्स आणि केमिकल्स प्रा. लि. या सुगंधी द्रव्य बनविणाऱ्या कारखान्याला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रथम आग लागली. या कारखान्यात बनवण्यात येणारी उत्पादने आणि कच्चामाल हा ज्वलनशील असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे यु.के. ॲरोमॅटिक्स कंपनीसह बाजूला असलेल्या श्री केमिकल्स आणि आदर्श टेक्सटाईल्स या आणखी दोन कंपन्या देखील आगीच्या भक्षस्थानी सापडल्या.
आणखी वाचा-पालघर : रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
आग लागताच यु.के.ॲरोमॅटिक्स तसेच बाजूच्या सर्व कंपन्यांमधील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही. जिवीतहानी झाली नाही. मात्र कारखान्यांना आगीची झळ पोचून मोठे नुकसान झाले आहे. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन, वसई विरार महानगरपालिका, पालघर नगर परिषद, अदानी पावर, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या एकूण आठ बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून ज्वलनशील पदार्थांमुळे आग नियंत्रणात आणण्यास अडथळे येत आहेत. घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. बोईसर पोलिसांनी आग लागलेल्या कारखान्यांचा परिसर बंद केला असून अग्निशमन दलांकडून आग नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.