लोकसत्ता वार्ताहर
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सर्पमित्र सागर पटेल यांनी धोकादायक स्टंटबाजी करत अजगर हाताळतानाचा एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन ते चार वर्षांच्या एका चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शेपटी देण्यात आलेली दिसत आहे. त्याच्या या धोकादायक स्टंटबाजीमुळे इतर सर्पमित्र व प्राणी मित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून सागर पटेल वर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
साप वाचवण्याच्या नावाखाली काही सर्पमित्रांकडून जीवघेणी स्टंटबाजी सुरू असून त्याचे परिणाम गंभीर होताना दिसून येतात. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सर्पमित्र सागर पटेल याने केलेली धोकादायक स्टंटबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजगर हाताळतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. मुळात हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे. मात्र या सर्प मित्राकडून अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार वारंवार होत असल्याचे इतर सर्पमित्र व प्राणी मित्रांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सागर पटेल याने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तीन ते चार वर्षांच्या एका चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शेपटी देण्यात आलेली दिसत होती. सागर पटेल स्वतः त्या अजगरासोबत असल्याचंही यात पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टंट म्हणून अपलोड करण्यात आला होता. मात्र कारवाईच्या भीतीने काही काळातच सागर पटेल याने तो इन्स्टाग्रामवरून काढून टाकला.
मात्र काही वेळातच तो व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर काही तरुणांनी प्रसारित केला. त्या व्हिडिओचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो पुन्हा प्रसारित केला. विशेषतः अशा प्रकारातील स्टंट व्हिडिओना वलय मिळवण्यासाठी व्हायरल करण्यात आले आणि त्यामुळे या प्रकाराची दखल वन्यजीव प्रेमींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यायला सुरुवात केली.
‘पीपल फॉर ॲनिमल वेल्फेअर’ संस्थेच्या वैशाली चव्हाण यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, सर्पमित्र सागर पटेल यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. वन्य प्राण्यांचा वापर करून लोकप्रियता मिळवण्याच्या नादात कोणीही त्यांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असेल, तर तो प्रकार सहन केला जाणार नाही. लहान मुलांना सोबत घेऊन असा जीवघेणा स्टंट करणं अक्षम्य आहे. यामुळे त्या मुलाच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण होतो, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणावर डहाणू वनविभाग काय कारवाई करतो, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या स्टंट व्हिडिओंना केवळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर अपलोड केलं गेलं आहे. मात्र यावेळी लहानग्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्पमित्रावर कायदेशीर पातळीवर ठोस पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सागर पटेल या व्यक्तीकडून या अगोदर देखील मोठमोठाल्या सापांसोबत धक्कादायक व्हिडिओ बनवून वायरल झाले होते. याबाबत आम्ही पीपल वेल्फेअर असोसिएशन ने तक्रार केली आहे. अशा सर्पमित्रांना वनमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे. अशा स्टंटबाजी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. -वैशाली चव्हाण, पीपल ऑफ ॲनिमल वेल्फेअर