पालघर: पोलीस भरती- २०१९ मधील पालघर जिल्ह्य़ातील ६१ पोलीस शिपाई पदांसाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी आपले पासवर्ड २२ ऑगस्टपर्यंत बदलण्याच्या सूचना पालघर पोलीस विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

पोलीस शिपाई पदासाठी ८१६७ उमेदवारांनी अर्ज केले असून या सर्व उमेदवारांनी आपले पासवर्ड बदलल्याशिवाय भरतीच्या पुढील प्रक्रियेत आपले आवेदन पत्र उघडू शकणार नाहीत, असे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे कळवले आहे. जे उमेदवार ई-मेल अ‍ॅड्रेस विसरले आहेत किंवा ज्यांना आपला ई- मेल किंवा पासवर्ड बदलायचा आहे त्यांना २२ ऑगस्टपर्यंत हे बदल करणे शक्य होणार आहे.

त्याचबरोबर सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गामध्ये आवेदन भरलेल्या उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापश्चात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल किंवा व राखीव (खुला) यापैकी एक विकल्प निवडणे अनिवार्य करण्यात आले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल हा विकल्प निवडताना शासनाच्या उत्पन्नाच्या अटी-शर्तीची माहिती करून घेण्याचे पोलीस अधीक्षक यांनी सर्व उमेदवारांना सूचित केले आहे.

पोलीस भरती उमेदवारांना काही अडचणी असल्यास http://www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर ‘पोलीस कॉर्नर’ या विभागांमधील ‘पोलीस भरती २०१९’ येथे क्लिक करून विकल्प सादर करावा तसेच आपला पासवर्ड बदलावा, असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.