हवामान बदलामुळे डिसेंबरपासून आंब्याला मोहोर नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा : हवामान बदल, जाणवणारी थंडी आणि दाट धुके यामुळे तलासरी तालुक्यात आंब्याला अद्याप मोहोर येण्यास सुरूवात झालेली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मोहोर फुटण्यास सुरू होतो, परंतु फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला असूनही तो न आल्याने तलासरीतील बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. तलासरी तालुक्यात सद्य:स्थितीत आंबा लागवड ही बागायतदार शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. परंतु या वर्षी हवामानातील सातत्याने बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर झाल्याचे दिसून येत आहे.  उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली परंतु तीही कमी प्रमाणात.  काही झाडांना थोडाफार आलेला मोहर अतिथंडीमुळे गळून गेला आहे.   तालुक्यात २५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात. हवामानातील बदलांमुळे दाट धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता उपलाट गावातील बागायतदार संदीप हरपले यांनी सांगितले.

पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत.    गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणात झाडांना मोहोर दिसत होता, त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती.  मात्र यंदा  गेल्या दहा दिवसांत पडलेल्या थंडी आणि दाट धुक्यामुळे आंब्याच्या मोहोराला फटका बसला  आहे.

हवामानातील बदल आणि लांबलेला पाऊस त्याचा परिणाम आंबा पिकांवर झाला असून त्यामुळे आंबा पिकाला उशीर झाला आहे. 

-प्रवीण खेवरा, कृषी साहाय्यक

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango production danger climate change ysh
Show comments