डहाणू/कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी सीमा तपासणी नाक्यावर मालवाहू टेंपोला भीषण आग लागली असून लाखो रुपये किंमतीच्या मालासह टेंपो आगीत जळून खाक झाला आहे. महामार्गावर अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे बाहेरील अग्निशामक यंत्रणा येईपर्यंत टेम्पो जाळून खाक झाला असून मोठी वित्त हानी झाली आहे.
हेही वाचा >>> पालघर : जलसार येथील टेकडीच्या पायथ्याशी मुरूम उत्खनन; भूस्खलन, दरड कोसळण्याची भविष्यात शक्यता
राष्ट्रीय महामार्गावर दापचरी सीमा तपासणी नाक्यावर गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भिवंडी वरून कापड आणि कापड व्यवसायासाठी लागणारे केमिकल भरून गुजरात कडे निघालेल्या टेंपोला आंतरिक बिघाडामुळे दापचरी सीमा तपासणी नाक्यावर भीषण आग लागली. याबात पोलिसांना माहिती मिळताच घटणास्थळी धाव घेऊन डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र अग्निशामक यंत्रणा पोहोचेपर्यंत टेंपोमधी लाखो रुपये किंमतीचा माल आणि टेंपो जळून खाक झाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सीमा तपासणी नाक्यावर गुजरातकडे जाणाऱ्या वाहनाची काही काळ वाहतूक कोंडी होऊन महामार्ग ठप्प झाला होता. प्राथमिक माहिती नुसार केबिन मध्ये इंजिन जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सकाळी टेंपोला लागलेली आग विझवण्यासाठी खानवेल दादरा नगर हवेली आणि अदाणी थर्मल पॉवर स्टेशन येथिल अग्निशमन दलाचे दोन पथक आले होते. मुंबई अहमदाबाद महामार्गावर आग विझविण्यासाठी कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अपघात किंवा भीषण आगीच्या घटना घडल्या नंतर महामार्गापासून लांब असलेल्या अग्निशामक दलाच्या पथकाला पाचारण केले जाते. मात्र तोपर्यंत उशीर होत असल्यामुळे वित्त आणि जीवित हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.