कासा: डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला असून दर्शन व जत्रेकरीता गुजरात वरून येणाऱ्या भाविकांमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे व शाळांच्या परीक्षा संपल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर पाहायला मिळाल्या.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला १२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. पौर्णिमेला सुरू होऊन अमावस्येपर्यंत चालणारी ही पंचक्रोशीमधील सर्वात मोठी यात्रा म्हणून महालक्ष्मीची यात्रा प्रसिध्द आहे.त्यामुळे या १५ दिवस चालणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेत गुजरात व आजूबाजूच्या शहरातून लाखोंच्या संख्येने भावीक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे व जत्रेचा पहिला दिवस असल्याने गुजरात तसेच राजस्थान येथून भाविक आलेले पाहायला मिळाले.
सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भिलाड पासून तलासरी पर्यंत जवळपास २५ ते ३० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुजरात कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. २५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाच ते सहा तासाचा अवधी लागला. या वाहतूक कोंडीचा फटका दैनंदिन मालवाहू गाड्या, भाविक, बाहेरगावी जाणारे प्रवासी व इतर वाहन चालकांना बसला.
इतर वेळी हा रस्ता पार करण्यासाठी एक ते सव्वा तास लागत असतो. परंतु राजस्थान गुजरात वरून येणारी वाहने व मुंबई कडून गुजरातकडे जाणाऱ्या चार चाकी, मालवाहू, अवजड व इतर वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र गुजरात सीमेवरती अच्छाड या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सेवा रस्त्यावरूनच वाहनांची वाहतूक सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दापचारी या ठिकाणी आरटीओ तपासणी नाक्यावरती येणाऱ्या मोठ्या गाड्यांची संख्या देखील जास्त असल्यामुळे दापचारी आरटीओ या ठिकाणीही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. दिवसा कडक ऊन असल्यामुळे मोठी गाडी चालवणारे वाहन चालक हे दिवसा एखाद्या झाडाखाली धाब्यावरती थांबतात आणि उष्णतेची तीव्रता कमी झाल्यानंतर आपली वाहने घेऊन मुंबई पुणे या दिशेने निघत असतात. त्यातच या यात्रेमुळे छोटा वाहनांना देखील या वाहतूकुंडीचा फटका बसलेला पाहायला मिळाला.
वापी येथून निघाल्यानंतर पालघर येथे पोहोचण्यात जवळपास दोन ते अडीच तासाचा अवधी लागत असतो. मात्र काल रात्री भिलाड व अच्छाड येथून सुरू झालेली वाहतूक कोंडी तलासरी पर्यंत होती. ही वाहतूक कोंडी जवळपास पहाटे चार वाजता कमी झाल्यानंतर पालघरला येण्यास ६.३० वाजले. या मार्गावर सुरू असलेली कामे, डहाणू येथील जत्रा व लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली.- निशान चुटके, वाहन चालक