निखिल मेस्त्री
पालघर: पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मातामृत्यूंची नोंद गेल्या वर्षी (२०२१-२२) झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कारणांमुळे २० मातामृत्यूंची नोंद झाली आहे. तर २९४ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. बालमत्यूचा आकडा कमी होत असला तरी मातामृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. याआधी २०१७-१८ मध्ये १९ मातामृत्यूंची नोंद झाली होती.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत मातांची तपासणी व त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवल्या जातात. असे असले तरी उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळत नसल्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे सांगितले जाते.
रुग्णावाहिका उपलब्ध न होणे, शासकीय प्रसूतिगृहामध्ये अनेक कारणे सांगून महिलांना इतरत्र उपचारासाठी पाठविणे यामध्ये वेळ वाया जात असल्यामुळे त्यामध्ये मातामृत्यू होत असल्याची कारणे देण्यात येतात. एकंदरीत आरोग्य विभागाच्या काही अपयशामुळे मातामृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असले तरी मातामृत्यू थांबवण्यासाठी हे प्रयत्न कमी पडत असल्याचे आरोप काही सेवाभावी संस्थांकडून केले जात आहेत.
ग्रामीण बहुल भागांमध्ये काही गरोदर माता शासकीय आरोग्य संस्थांच्या कक्षेतून बाहेर राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची किंवा त्यांची नोंद शासनदरबारी होत नाही. हे पाहता मातामृत्यूचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये करोना हेही मातामृत्यू होण्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष करोनावर केंद्रित झाल्यामुळे माता यांच्यासाठी असलेल्या आरोग्य सेवांवर दुर्लक्ष झाले. परिणामी, मातामृत्यू वाढत गेले. या दरम्यान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी मोजकीच रुग्णालये उपलब्ध असल्याने अनेक मातांना प्रसूतीसाठी फरपट करावी लागली. गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक मातामृत्यू पाहता आरोग्य व्यवस्था हवे तसे प्रयत्न करत नसल्याचे आरोप होत आहेत.
पाच वर्षांत ५०० बालविवाह
ग्रामीण भागांमध्ये बालविवाहसारख्या अनिष्ट रूढी परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका अहवालात म्हटले होते. न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते. बालविवाहमुळे कुपोषण व मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत.
ग्रामीण भागांमध्ये शिक्षण व प्रबोधन नसल्यामुळे बालविवाह फोफावत आहेत. याचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद त्यांच्यामध्ये जागरूकता आणून मातामृत्यू कमी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल व तो आकडा कमी होईल अशी आशा आहे. -वैदेही वाढाण, अध्यक्ष, जि. प. पालघर
जिल्ह्यात मातामृत्यूची संख्या चिंताजनक; वर्षभरात २० मातामृत्यूंची नोंद; गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक नोंद
पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मातामृत्यूंची नोंद गेल्या वर्षी (२०२१-२२) झाली आहे.
Written by निखिल मेस्त्री
First published on: 13-05-2022 at 00:07 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maternal mortality district alarming maternal deaths recorded during year highest record last seven years amy