डहाणू : डहाणूतील जुन्या बांधकामांवर नगर परिषदेने कारवाई केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी महाविकास आघाडीने (मविआ) धडक मोर्चा काढला. शहरातील अतिक्रमणांविरोधात नगर परिषदेने कारवाई केली होती. या कारवाईविरुद्ध ‘मविआ’ने आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. त्यात ‘मविआ’तील माकप, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वैभव आवारी यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. या वेळी जुन्या घरांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करून बेकायदा बांधकामांवर अंकुश ठेवण्यात येईल. घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत देयकांवरील व्याजदर कमी करण्यात येईल, डहाणू गावातील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी निर्माण होणाऱ्या सीआरझेडच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला जाईल, प्रभूपाडा व अन्य भागांतील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. शिवाय नवीन घरांच्या बांधकामासाठी व बेकायदा घरांवर कारवाई न करण्यासाठी पैशांच्या मागणीबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आवारे यांनी दिले.