लोकसत्ता वार्ताहर
पालघर : कर्नाटक येथील मच्छीमारांच्या समस्यांबाबत नॅशनल फिश वर्कर्स शिष्टमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन मच्छीमारांच्या समस्या मांडल्या. यावेळी नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
उत्तराकानडा मधील प्रस्तावित बंदर प्रकल्प तात्काळ मागे घेणे व मच्छिमारांवर पोलिसांच्या अत्याचारांवर कारवाई करण्याच्या मागणी करिता नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) शिष्टमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची १५ एप्रिल रोजी भेट घेतली. नॅशनल फिशवर्कर्स फोरम चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने बैठक घेऊन प्रस्तावित होन्नावर, आंकोला – केणी व कारवार बंदर प्रकल्प आणि इतर किनारी पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उत्तरा कन्नड येथील स्थायिक मासेमार समुदायांचे जीवनमान धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमाला आणि संबंधित खाजगी बंदर विस्तारांना मच्छीमारांकडून सतत विरोध होत आहे. त्या अनुषंगाने कर्नाटकातील मच्छीमार चळवळीसाठी या बैठकीचे आयोजन आवश्यक होते. या बैठकीत कारवार, अंकोला-केणी आणि होन्नावर या किनारपट्टीवरील मच्छीमार प्रतिनिधींनी पारंपारिक मच्छीमारांच्या जमिनीवरील वास्तव मांडल्या आणि या प्रकल्पांमुळे झालेल्या सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक नुकसानावर भर दिला.
नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि मच्छीमारांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे सविस्तरपणे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांसोबत बैठका घेण्यात येतील असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. तसेच शांततेत आंदोलन करणाऱ्या मच्छीमारांवर होन्नावरमध्ये झालेल्या पोलिस हिंसाचाराचाही शिष्टमंडळाने तीव्र निषेध केला आणि जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व नॅशनल फिश वर्कर्स फोरम चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि सरचिटणीस ओलेन्सियो सिमोस यांनी केले. त्यात उत्तर कन्नडचे प्रतिनिधी मच्छीमार आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा समावेश होता. संबंधित मागण्या पूर्ण न केल्यास नॅशनल फिश वर्कर्स फोरम आपले आंदोलन तीव्र करेल आणि विनाशकारी बंदर प्रकल्प पूर्णपणे मागे घेईपर्यंत आणि शांततापूर्ण निदर्शकांवर झालेल्या हिंसाचारासाठी न्याय मिळेपर्यंत सतर्क राहील असा इशारा बैठकीदरम्यान मच्छीमारांनी दिला.
नॅशनल फिश वर्कर्स फोरमने मांडलेल्या मागण्या
१. सागरी जैवविविधता आणि हजारो पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेला धोका निर्माण करणारा होन्नावर, आंकोला -केणी व कारवार बंदर प्रकल्प तात्काळ रद्द करावे.
२. शांततापूर्ण निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या होन्नावर बंदर प्रकल्पावरील गुन्हेगारी आरोप मागे घ्यावेत.
३. सागरी आणि किनारी भागातील पारंपारिक समुदायांच्या सार्वभौम हक्कांना कायदेशीर मान्यता द्यावी.
४. कोणत्याही किनारी विकास प्रकल्पापूर्वी अनिवार्य सार्वजनिक सल्लामसलत यासह पारदर्शक आणि लोकशाही प्रक्रियांची अंमलबजावणी करावी.
५. केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला, विशेषतः अदानी समूहासारख्या खाजगी कंपन्यांना सार्वजनिक बंदरे हस्तांतरित करण्यास तीव्र विरोध.
६. अलिकडच्या निदर्शनांमध्ये होन्नावरमध्ये झालेल्या पोलिस हिंसाचारासाठी त्वरित कारवाई करावी.