Palghar MLA Shrinivas Vanga: पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने तिकीट कापल्यानंतर नाराज झालेले वनगा मागच्या चार दिवसांपासून आपल्या घरातून बेपत्ता झाले होते. ते अज्ञातस्थळी कुणालाही न सांगता गेल्यामुळे त्यांचे कुटुंबिय आणि शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. त्यांना शोधण्याचेही बरेच प्रयत्न झाले. अखेर दोन दिवसांनी वनगा आता घरी परतले आहेत. तिकीट न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका आणि उद्धव ठाकरेंचे कौतुक वनगा यांनी केले होते. शिंदे गटात येऊन चूक झाली, असेही ते म्हणाले होते. मात्र घरी परतल्यानंतर आता श्रीनिवास वनगा यांचे सूर बदलल्याचे दिसले.
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना श्रीनिवास वनगा म्हणाले, “मी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेलो होतो. पालघर किंवा डहाणू विधानसभेसाठी मला तिकीट नक्कीच मिळेल, अशी मला अपेक्षा होती. पण तिकीट न मिळाल्यामुळे मी थोडा नाराज होतो. पण मी ठाकरे गटाशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. माझे तिकीट कापण्यासाठी काही जणांनी षडयंत्र रचले. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. यापुढे शिंदे सांगतील ते काम मी करेन.”
जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझ्याविरोधात कट रचला, असा आरोप श्रीनिवास वनगा यांनी केला. कालपासून माझ्या मुलाची प्रकृती ठीक नाही. माझी आईही आजारी आहे. मला कुटुंबासाठी जगायचे आहे. त्यामुळे मी आता शांत राहून पुढची भूमिका घेईल, असेही वनगा म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी घात केला का?
बेपत्ता होण्यापूर्वी श्रीनिवास वनगा म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांनी माझा घात केला, त्यांच्या या विधानाबाबत प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी नाही तर त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी माझा घात केला. एकनाथ शिंदेंची दिशाभूल करण्यात आली. मी यापुढेही प्रामाणिक राहून काम करत राहील. मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे.
उद्धव ठाकरेंना भेटणार का?
उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत, असं श्रीनिवास वनगा म्हणाले होते. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरे चांगलगे व्यक्ती आहेत. पण आज मी कोणत्याही पक्षात जाण्याच्या मानसिकतेत नाही. तसेच गोव्यात जेव्हा सर्व आमदार नाचत होते, तेव्हा मी त्यांच्यात नव्हतो. मी माझ्या खोलीवर होतो, असेही ते म्हणालो. महाविकास आघाडीच्या काळात काहीही काम नव्हते. त्यामुळेच एकनाथ शिंदेंना साथ दिली. त्यांच्यामुळेच माझ्या मतदारसंघात १२०० कोटींचा निधी आणू शकलो, असेही वनगा म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd