लोकसत्ता वार्ताहर

कासा : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फुलशेती लागवडीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न यायला सुरुवात झाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हायला लागली होती. परंतु पूर्वी एक हजार ते १२०० प्रतिकिलो विकला जाणाऱ्या मोगऱ्याचे दर गडगडून ३०० ते ४०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामानातील बदल तसेच औषधे, खतांचे, वाहतुक खर्च व मजुरी वाढली आहे. त्यामुळे सध्याच्या विक्री दरात उत्पादन खर्च निघत नसल्याने मोगरा फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पालघर जिल्हयात वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यात मोगऱ्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात प्रति हेक्टरी तीन ते साडेतीन टन मोगरा फुलांचे वार्षिक उत्पन्न येते. जिल्ह्यामध्ये १८६ हेक्टर क्षेत्रावर मोगऱ्याची लागवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.

मोगरा शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने तसेच कृषी विभागाने मोगरा लागवडीला प्रोत्साहन दिल्याने जिल्ह्यतील अनेक तरुण शेतकरी मोगरा लागवडीकडे वळले होते. मोगरा शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मोगरा उत्पादक शेतकरी भल्या पहाटे उठून फुले घेऊन बस किंवा खाजगी वाहनाने मुंबईच्या बाजारपेठेत जाऊन आपली फुले विकतो. तेथे त्याला ठरलेल्या बाजार दरात मोगरा फुले विकून रोख पैसे मिळतात. त्यावरच या शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरू असते. परंतू दर मिळत नसल्याने या शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे.

एकीकडे मोगरा पिकासाठी लागणारी किटकनाशके औषधांच्या किंमती वाढल्या आहेत. खतांच्या किंमती बरोबर इंधनाचे दर वाढल्याने वाहतूकखर्च वाढला आहे. हिवाळ्यामध्ये मोगरा उत्पादन कमी असल्यानेबाजारात चांगला दर मिळत होता मात्र उन्हाळा सुरू झाल्यानंतर मोगऱ्याची आवक वाढल्याने मोगरा फुलाचे दर कोसळले आहेत. गुढीपाडव्या पाठव पाठ अनेक सण येत आहेत. तसेच लग्नांच्याही तारखा या महिन्यात आहेत. त्यामुळे मोगरा फुलांच्या दरात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र मोगऱ्याचे उत्पादन व वाहतुकीवर होणारा खर्च मोगरा फुलांच्या विक्रीतून होत नसल्याने जिल्ह्यातील मोगरा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ऑगस्ट महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत मोगरा फुलाला प्रतिकिलो ६०० ते १२०० रुपये दर मिळतो. मार्च ते मे महिन्यातही यापूर्वीच्या काळात ४०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असे. परंतू यावर्षी मोगरा उत्पादन वाढल्याने २०० ते ३०० रु प्रतिकिलो असा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्याच्या तुलनेत २०० ते ३०० प्रति किलो दर कमी मिळतआहे. -नरेश गावंडा, शेतकरी- जव्हार