बोईसर : पालघर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन गुंतवणूक आकर्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य उद्योग विभाग आणि पालघर जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ, इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगासमवेत जवळपास २२०० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध क्षेत्रातील नवीन आणि विस्तारीत १५८ उद्योगासमवेत दोन हजार २०० कोटींचे गुंतवणुक सामंजस्य करार करण्यात आले. या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी गुंतवणूक परिषदेत उपस्थित सह्भागीना संबोधित करताना जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करून अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी रस्ते, वीज, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विविध स्तरावर प्रशिक्षण देण्याची योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येऊन सकारात्मक वातावरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती दिली.
२०२४ मध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत २५० उद्योगांकडून १५ हजार कोटीचे गुंतवणुक सामंजस्य करार झाले होते. मात्र या वर्षी मोठ्या उद्योगापेक्षा जिल्ह्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्यामुळे गुंतवणूक कमी झाल्याची माहिती कोकण विभागाच्या सहसंचालक विजू सिरसाठ यांनी दिली. जिल्हास्तरावर गुंतवणुक आकर्षित करणे, गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आणि जिल्हयांना केंद्रबिंदु मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे सिरसाठ यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात आर्थिक गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामंज्यस्य कराराच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना उद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आवश्यक परवानग्या व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक टप्यावर सहकार्य केले जाते. महा-डिफेन्स एक्स्पो, राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार, इग्नाईट महाराष्ट्र, समूह विकास योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजना, उद्योग धोरण इत्यादी विषयांवर परिषदेत सहभागी उद्योजक, नव उद्यमी, बँकांचे प्रतिनिधी याना मार्गदर्शन करण्यात आले.
या परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. इंदुरानी जाखड, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू सिरसाठ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उदय किसवे, टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांच्यासह उद्योजक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत पार पडलेले प्रमुख सामंजस्य करार:
अँकरी ऑरगॅनिक : ८४ कोटी
कॅन्बारा इंडस्ट्रीज : ६५.६२ कोटी
एमिल फार्मा : ६१.८० कोटी
केके टीएमएटी : ४९ कोटी
रिजेन्सी टीएमटी : ४८.५० कोटी
गुजरात कॉपर : ४८ कोटी
आर के हायड्रोजन : ४८ कोटी
प्रोफ़ाईल डाटा : ४८ कोटी
पिरामिड टेक्नोलोजी : ४६ कोटी
मॅनसर्फ इंडस्ट्री : ४५.७५ कोटी