पालघर : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यकाळाला  तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ येत्या १७ नोव्हेंबर रोजी संपत आहे. पुढील सव्वादोन वर्षांसाठी अध्यक्षपदासाठी १७ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी निवडणूक घेतली जाणार आहे. या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपद राखण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण विराजमान आहेत. त्यांचा कार्यकाळ १७ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.  सोबत जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापतीपदांच्या कार्यकाळाला देखील मुदतवाढ देण्यात आली होती. या निवडणुका याच सुमारास होणे अपेक्षित आहे. डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार व मोखाडा येथील पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीं सदस्यांसाठी राखीव आहे. या पदांवर चक्राकार पद्धतीने बदल करण्यात येणार आहे. तर वसई व पालघर पंचायत समितीच्या सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सध्या पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्तास्थानी असली तरी शिवसेनेमध्ये फूट पडल्याने शिवसेनेकडे असणारे २० सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांनी अधिकृतपणे किंवा छुप्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. सध्या शिवसेनेकडे असल्या सदस्यांपैकी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या पाच सदस्यांचा अजूनही शिवसेनेच्या मूळ गटात समावेश झालेला नाही. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत नवीन गट स्थापनेसाठी नेमके किती सदस्य लागणार आहेत याबाबत वेगवेगळे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. शिंदे समर्थकांचा स्वतंत्र गट निर्माण झाल्यास १२ सदस्य व काँग्रेसमधून निवडून आलेल्या एका सदस्याचा पाठिंबा असणाऱ्या भाजपसोबत नवीन राजकीय सूत्रानुसार अध्यक्षपद मिळवू शकतील, अशी स्थिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी १३ सदस्यांचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे. आवश्यकता भासल्यास त्यांच्यामध्ये देखील फूट पाडण्यासाठी सत्ताधारी गट प्रयत्नशील असल्याचे समजते. याखेरीज कम्युनिस्ट पक्षाकडे अपक्षांचा पाठिंब्यासह पाच, बहुजन विकास आघाडीकडे चार व एक अपक्ष सदस्य असे जिल्हा परिषदेतील बलाबल आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांपैकी अध्यक्ष वैदेही वाढण, गटनेते प्रकाश निकम, सारिका निकम, नीता पाटील, मंगेश भोईर, राजेश मुकणे, मिताली बागुल, गणेश उंबरसडा अशा आठ सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी आमदार अमित घोडा यांची भाजप प्रवेश घेतला आहे. तर त्यांची पत्नी अमिता घोडा व श्रमजीवी संघटनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सदस्यांचा पाठिंबा पालघर जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी गटाला असण्याची शक्यता आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय हालचालीला जिल्ह्यात वेग आला आहे.