वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ एक अपघाताचे सत्र सुरूच आहे. तीन दिवसांत महामार्गावर अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडाजवळील खाडी पुलावर सकाळी सव्वाचारच्या सुमारास मिक्सर व कंटेनर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. महामार्गावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. मालजीपाडा येथील खाडी पुलाजवळील दुभाजकाच्या जवळून वाहतूक करणाऱ्या आरसीसी मिक्सरने अचानक वळण घेतल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक लागून अपघात घडला. यात चालक कॅबिनमध्ये अडकून दबल्याने जागीच ठार झाला आहे. हरिचंद्र रामनिवास यादव (४५) असे त्याचे नाव आहे. तर दुसरी घटना रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महामार्गावरील खानिवडे येथे गुजरात वाहिनीवरून जाणाऱ्या भरधाव कारची पुढे चालणाऱ्या रिक्षाला पाठीमागून धडक लागून अपघात झाला. यात  रिक्षाचालक बिंद्रा प्रजापती सिंग (५२) गंभीर जखमी झाला आहे. तर कारमध्ये असलेले प्रदीप विश्वकर्मा (३०), उदय सिंग (२६) हेही यात यात जखमी आहेत. या दोघांना वसई येथे हलविण्यात आले असून रिक्षाचालकावर महामार्गावरील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader