खड्डय़ांमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चर्चेत असताना आता महामार्गावरील पथ दिव्यांची वीज गायब झाली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा एकूणच नियोजनशून्य कारभार दिसून येत आहे. पालघर जिल्हा हद्दीतील दोन टोल नाक्यांसह महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेला दापचरी सीमा तपासणी नाक्यावरील विजेचे मोठे दिवेही बंद आहेत.
जुलै महिन्यापासून वीज देयके न भरल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे समजते. महामार्गावर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे सेवा रस्ते, मुख्य उड्डाणपुलांवर असलेले पथदिवे बंद असल्याने वाहनांना रात्रीच्या वेळेस किंवा खूप पाऊस पडत असताना समोरचे काही दिसेनासे होते. त्यातच महामार्गावर खड्डय़ांची काही कमी नाहीच. रात्रीच्या वेळी उड्डाणपूल, सेवा रस्ते, उड्डाणपुलाच्या खालून जाणारे भुयारी मार्ग, वळणावर असलेले पथदिवे, मुख्यत्वे महाराष्ट्र सीमा तपासणी नाका व टोल नाक्यांवर असलेले हायमॅक्सचे मोठे दिवे सुरू असणे आवश्यक आहे. मात्र वीज देयके न भरल्याने या दिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे गेले १०-१५ दिवस महामार्गावर काळोख आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गामध्ये मालजी पाडा, सुवी पॅलेस उड्डाणपूल, पुढे चिल्हार उड्डाणपूल, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, चारोटी टोल नाका, महालक्ष्मी मंदिर परिसर, दापचरी सीमा तपासणी नाका, तसेच इतर उड्डाणपूल अशा अनेक ठिकाणी पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. पथदिवे नसल्याने अपघाताची भीती आहे.
महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय भरुच गुजरात येथे आहे. महाराष्ट्रामध्ये महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालयच नसल्यामुळे तक्रारदारांना टोल नाक्यांवर असलेल्या तक्रार पेटय़ांवर तक्रार द्यावी लागते. या तक्रारी मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचतात की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे हा प्रश्न आहे.
वीजपुरवठा का खंडित?
महावितरण विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वीज देयक थकीत असल्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. त्याला प्राधिकरणाने प्रतिसाद न दिल्याने वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजते. याउलट अशी कोणतीही माहिती महावितरणने प्राधिकरणाला दिलेली नाही असे महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी राहुल जालान यांनी म्हटले. तसेच मला प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही, असे उत्तर जालान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.