मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हजारो ब्रास राडारोडा
नितीन बोंबाडे
डहाणू : मुंबईतील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी तोडकामातून निघालेल्या बांधकाम कचऱ्याचे ढीग मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या वेशीवर टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पालघर तालुक्यातील टेन येथील सव्र्हे नंबर १०४ लगत सर्वात जास्त कचऱ्याचा ढीग पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात पुनर्विकासात अनेक जीर्ण इमारती तोडण्यात आल्या आहेत. हा बांधकाम कचरा मुंबईत टाकण्यासाठी जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे विकासक लगतच्या पालघर जिल्ह्यातील मोकळय़ा भूखंडाचा शोध घेत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धाबेमालक तसेच बांधकाम व्यावसायिक चाळ माफियांकडून मनोर, हालोली या भागांत जवळपास ३० हजार ब्रास बांधकाम कचऱ्याचा ढिग पाहायला मिळतो.
पालघर तालुक्यातील हलोली, मनोर, टेन या भागांत तर कचरा भूमी तयार होऊ लागली आहे. येथे राजरोसपण कचरा टाकला जात असल्याचे दिसत आहे.या बांधकाम कचऱ्यामुळे भातशेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. मनोर नजीकच्या टेन, हलोली या भागांत हजारो ब्रास बांधकामातील कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत जमिनीचा सखल भाग समांतर करण्यासाठी व खड्डा बुजवण्यासाठी येथे कचऱ्याचा वापर केला जातो. नांदगाव हद्दीत गणेश विसर्जन घाटाजवळ सूर्या नदीच्या पूरक्षेत्रात अनधिकृत बांधकामे उभारले गेली आहेत. त्यांचाही कचरा येथे पडलेला असतो. इतके सर्व समोर घडत असतानादेखील महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चय व्यक्त होत आहे. महामार्गालगतचा सखल भागात सर्रासपणे टाकाऊ बांधकाम साहित्य हालोली, बोट, नांदगाव, चारोटी याभागात जागोजागी टाकण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या भागात अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारण्याचे प्रकारही सुरू आहेत. मऊ विटांच्या भरावामुळे जमिनीची संकुचित पातळी कमजोर बनत असल्याने जमिनीची पत आणि बांधकामाचा दर्जा सुमार होत असतानाही स्थानिक ग्रामपंचायत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाई होत नसल्याने नाराजी आहे.
कचरा टाकणे तसेच बांधकामाबाबत कोणतीही परवानगी दिलेली नाही. संबंधित ठिकाणी तलाठय़ांना पाठवून त्या ठिकाणचा अहवाल मागविला जाईल. त्याची पाहणी करून कारवाई करू. रासायनिक कचरा असेल तर प्रदूषण नियामक मंडळ त्याविरुद्ध कारवाई करू शकते.
– संदीप म्हात्रे, मंडळ अधिकारी, मनोर