पालघर : पालघर जिल्हा मुख्यालय संकुलात स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्हा ग्राहक मंच चार आठवड्याच्या आत कार्यरत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई उच्च न्यायालयाने आज पालघर जिल्ह्यात जिल्हा ग्राहक मंच स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या दत्ता रानबा अडोदे यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेचा निकाल दिला.

४ फेब्रुवारी २०२५ च्या सरकारी अधिसूचनेनुसार, पालघर येथे जिल्हा ग्राहक मंच आधीच स्थापन करण्यात आला आहे. ग्राहक मंचाच्या कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारने १० फेब्रुवारी २०२५ रोजीची अधिसूचना जारी केली आहे असे या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकार तर्फे वकिलानी असे सादर केले.

मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने ग्राहक मंचाचे कामकाज कधी सुरू होईल असा प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरात राज्य वकिलांनी असे उत्तर देताना ग्राहक मंचासाठी कर्मचारी दोन आठवड्यात उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती दिली.

राज्याच्या युक्तिवादांना लक्षात घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली. राज्य सरकारला चार आठवड्यांच्या आत पालघर जिल्हा ग्राहक मंच कार्यरत करण्याचे आणि त्याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पालघर जिल्हा मुख्यालय संकुलाच्या प्रशासकीय ब इमारतीत दालन क्रमांक १०१ मध्ये जिल्हा ग्राहक मंच करिता जागा निश्चित करण्यात आली असून पुढील महिन्याभरात हा मंच कार्यरत होईल असे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे.