पालघर : रायगड जिल्ह्यात इर्षालवाडी (२०२३), तळीये (२०२१) या ठिकाणी झालेल्या भूस्खलन दुर्घटनेनंतर राज्य शासनाने दखल घेऊन दरड प्रवण क्षेत्राचा अभ्यास करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याचे योजिले आहे. असे असताना पालघर तालुक्यातील जलसार येथे असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठेकेदारांनी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय सुमारे २५ मीटर लांबीच्या क्षेत्रफळात मुरूम उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जलसार गावातील एका भागाला धोका निर्माण झाला आहे.

जलसार ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये दगड खाणीच्या कामासाठी सपाटीकरण सुरू असल्याचे आदिवासी समाजोन्नती सेवा संघ (पालघर) या संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास काही दिवसांपूर्वी आणून दिले होते. खोदकाम करणाऱ्या यंत्रांच्या साह्याने जलसार येथील टेकडीचा एक मोठा भाग विनापरवानगी खोदून नेला जात असल्याचे या संघटनेच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामुळे दरड कोसळणे किंवा तत्सम प्रकार घडून टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांना धोका असल्याने हे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पालघर: पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्ण होणार; जिल्हा परिषदेकडून विशेष निधीची करणार तरतूद

विशेष म्हणजे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी या टेकडीचा पायथ्याचा खासगी मालकीचा भाग संपादित करून त्या ठिकाणी हे खोदकाम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र असे करताना महसूल विभागाची परवानगी नसल्याचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी लोकसत्ताला सांगितले.

मुळात याप्रकरणी परवानगीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उत्खनन झाले नसल्याचे सांगण्यात आले. परवानगीसाठी अर्ज उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आला असून अर्जाच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी अजूनही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. उत्खनन केलेली मुरूम माती त्याच परिसरातच पसरवली जात असली तरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीचा विचार न करता तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना न आखता हे काम सुरू असल्याने गावकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा – शिक्षण विभागात पदोन्न‌ती होत नसल्याने १५१ पैंकी १२८ केंद्रप्रमुखांची पदे रिक्त, रिक्त पदांचा अधिभार इतर शिक्षकांवर

जलसारबरोबरच कांद्रेभुरे, सरावली व सफाळे पश्चिमेच्या काही भागांमध्ये राष्ट्रीय प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असून त्याचा वापर खाजगी कामासाठी होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यातला काही भाग वनविभागाच्या अंतर्गत असल्याचे सांगत खाडीमध्ये भूसृंगाचा स्फोट केल्याने लगतच्या घरांना धोका असल्याचे आदिवासी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

जलसार या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असून या डोंगरावर मेघदेवाचे मंदिर व शेजारी जिवंत पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहे. स्फोटामुळे भूजलपातळीमध्ये प्रभाव होऊन पाण्याचे स्रोत नाहीसे होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून विनापरवानगी मुरूम उत्खनन करणाऱ्या तसेच सपाटीकरण करणाऱ्या संस्थाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जलसार परिसरात टेकडीच्या पायथ्याशी विनापरवानगी माती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येईल. – गोविंद बोडके, जिल्हाधिकारी

Story img Loader