विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले देण्याचा उपक्रम
पालघर: तलासरी तालुक्यातील पंचायत समिती, शिक्षण विभाग व महसूल विभाग यांनी एकत्रित येत विद्यार्थ्यांना शाळेत व घरपोच दाखले देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांद्वारे तलासरीमधील जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील दाखले नसलेल्या ८५६२ विद्यार्थ्यांंपैकी ६५८३ विद्यार्थींचे दाखले तयार झाले आहे.
या पथदर्शी कार्यक्रमाला ‘माझा दाखला माझी ओळख’ असे नाव देण्यात आले आहे. तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पुढे आला आहे. उपविभागीय अधिकारी आश्विनी मांजे, तहसीलदार स्वाती घोंगडे यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला आहे. प्रातिनिधिक तत्त्वावर या दाखल्यांचे वाटप आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते कवाडा जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध व्हावेत यासाठी पंचायत समिती व महसूल विभागाने एकत्रित येत हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या प्रशिक्षणाचा आधारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांंच्या पालकांकडून दाखल्यांचे परिपूर्ण अर्ज सेतू कार्यालयात सादर केले व तेथे नेमणूक केलेल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत या पात्र अर्जांवर विनाविलंब निर्णय घेण्याचे अधिकार दिले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंचे दाखले तातडीने तयार करून त्यांना घरपोच करण्याची व्यवस्था या पथदर्शी कार्यक्रमातून करण्यात आली विद्यार्थ्यांंना शाळेतच जातीचे दाखले मिळत असल्याने जातीच्या दाखल्यासाठी त्यांची होणारी फरफट थांबली व भविष्यात त्यांना दाखल्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असे पंचायत समिती व महसूल प्रशासनाने म्हटले आहे.
दाखला देण्याच्या मोहिमेत आदिवासी विकास विभागाने पुढाकार घ्यावा आणि यासाठी लागणाऱ्या निधीची आणि इतर गोष्टींची व्यवस्था करावी. राज्य सरकारने हा पथदर्शी उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबवल्यास जातीच्या दाखल्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघेल.
-विवेक पंडित, अध्यक्ष,आदिवासी क्षेत्र आढावा समिती