निखिल मिस्त्री, लोकसत्ता

पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी परिसरातील अपघातप्रवण क्षेत्र चर्चेत आले आहे. मात्र, येथील अपघातांचा धोका कमी करण्याकरिता उपाय योजण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चक्क हे अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दडवण्याची क्लृप्ती योजली आहे. या अपघात क्षेत्राची खुण समजल्या जाणाऱ्या मैलदगडावरील अंतराची नोंद चक्क दोन किमीने कमी करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे एखाद्या महामार्गावर तीन वर्षांत पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपघातांत दहा पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले असतील तर त्याला अपघात प्रवण क्षेत्र  म्हणून जाहीर केले जाते. महामार्गावरील मैलदगडावरील अंतर हे त्या ब्लॅक स्पॉटची खुण समजली जाते. सायरस मिस्त्री यांच्या वाहनाचा अपघात झाला ते ठिकाणही अपघातप्रवण क्षेत्रात मोडते. असे असताना त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना न राबवल्याचा ठपका बसण्याच्या शक्यतेने महामार्ग प्राधिकरणाने मैलदगडाची खुणच दडवण्याचा प्रकार केला आहे.

धक्कादायक आकडेवारी..

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर ते आच्छाड या ५२ किमीच्या मार्गात गेल्या दीड वर्षांत ९०हून अधिक अपघात झाले. यात १०६ जणांचा बळी गेला तर, ४९ जण कायमस्वरूपी जायबंदी झाले. चारोटी येथे आतापर्यंत ३०२ अपघातांत ३२ जण मृत्युमुखी पडले आहेत.

याआधीही असे प्रकार..

याआधी डहाणूनजीकच्या गुलझाली पुलावरील मैलदगडावरही असा फेरफार करण्यात आला होता.  त्या शेजारी लावलेल्या फलकावर मात्र जुनीच नोंद कायम आहे.

महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ दडवण्यासाठी केलेले हे कटकारस्थान आहे. असे प्रकार करून अपघात प्रवण क्षेत्र आणि मृत्यूंची संख्या लपवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, असे बदल वाहनचालकांसाठी अधिक धोकादायक आणि संभ्रम निर्माण करणारे आहेत. – राजीव चौबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रेसिलेंट इंडिया ( मार्गावर सुरक्षेसाठी काम करणारी संस्था)

चारोटी पुलाच्या चुकीच्या आखणीमुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. आता चूक लपवण्यासाठी अंतर बदल करून सारवासारव करण्यात येत आहे. – हरबन्स नन्नाडे, प्रवक्ता, अखिल भारतीय वाहन मालक-चालक संघ

काय केले?

मिस्त्री यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या सूर्या पुलापासून सुमारे पाचशे मीटर अलिकडे मैलदगडावर ‘चारोटी तीन किमी’ अशी नोंद होती. मात्र, या मैलदगडावर सफेद रंग फासून आता ‘चारोटी एक किमी’ अशी नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही रंगसफेदी करताना मैलदगडावरील ‘अहमदाबाद ४२०’ ही नोंद मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

यामुळे होते काय?

’मैलदगडावरील नोंदींचा बनाव हा सहजासहजी लक्षात येणारा नाही. मात्र, त्याला सरकारी दस्तावेजात विशेष महत्त्व आहे. पूर्वी चारोटी भागात झालेले अपघात आणि बळींची नोंद मैल दगडानुसार ‘चारोटी ३ किमी’ अशी होत होती.

’मात्र, आता ती नोंद बदलली जाईल आणि सरकारी दस्तावेजांवरील ‘चारोटी ३ किमी’ वरील अपघातांची नोंद आपोआप कमी होईल. त्यातून अपघात प्रवण क्षेत्र कमी केल्याचा दावा प्राधिकरणाला करता येईल.

Story img Loader