हॉटेलसमोरील दुभाजक तोडून बेकायदा वळणमार्गाची निर्मिती
नितीन बोंबाडे
डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खासगी धाबे मालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी थेट नैसर्गिक नाले, गटारांवर अतिक्रमणे केली आहेत. या प्रकरणी मंगळवारी नांदगाव येथील धाबेमालकाला प्राधिकरणाने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मनोर, नांदगाव, चिल्हार, सोमटा, चिंचपाडा, चारोटी आंबोली ते आच्छाडपर्यंत धाबे मालकांनी पोच रस्त्यासाठी गटारे तसेच नाल्यांवर माती भराव तसेच क्राँक्रीटीकरण करुन नैसर्गिक नाले बंद केले आहेत. परिणामी महामार्गालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे तयार होऊन महामार्गावर पाणी साचून वाहतुकीस धोका निर्माण होत आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रविण भिंगारे यांनी याप्रकरणी धाबे मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे
सांगितले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला खासगी हॉटेल तसेच धाबे बांधण्यात आले आहेत. सहा पदरी महामार्ग आणि पोच रस्ता यांच्यामध्ये नैसर्गिक पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नाल्यांवर धाबे मालकांनी नाला बुजवून त्यामध्ये माती भराव तसेच डांबरीकरण करुन वाहनांसाठी पोच रस्ते तयार केले आहेत. धाबे मालकांनी स्वार्थासाठी राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर पणे दुभाजक तोडून धोकादायक वळणे तयार केले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते तसेच आरओडब्लू (राईट ऑफ वे) वर काँक्रीटीकरण करुन पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे धाबे तसेच हॉटेल समोरच अपघातजन्य ठिकाणे तयार होत आहेत. याविरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण धारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरील आर ओडब्लूवर अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अपघातजन्य परिस्थीती निर्माण होते. नांदगाव येथील अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण भिंगारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी