कासा: मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावर काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून पालघर जिल्ह्यातील ६३ किलोमीटर पट्ट्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. डहाणू जव्हार राज्य मार्गावरून गंजाड हद्दीतून महामार्ग जाणार असून याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असताना योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे शहापुर सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
डहाणू जव्हार राज्य मार्गावर गंजाड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना कामगारांची सुरक्षा, सुरक्षा साधने आणि पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आहे. याठिकाणी पुलाच्या गर्डर वर स्लॅब साठी सिमेंटची शिट टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना हेल्मेट, हातमोजे, बुट, सुरक्षा जॅकेट उंचावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी बेल्ट यांसारखी आवश्यक सुरक्षा प्रसाधने उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पुलावर अवजड सिमेंट शीट टाकण्याचे काम सुरू असताना पुलाखालील वाहतूक सुरू असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तसेच संपूर्ण महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> पालघर: सायरस मिस्त्री अपघात क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुधारणा तरीही वर्षभरात महामार्गावर १५६ प्रवाशांचा मृत्यू
१ ऑगस्ट २०२३ रोजी शहापूर येथे पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला होता. या अपघातात १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून असून काही जण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी कामे करताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. मात्र असे असून देखील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे संबधीत प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तू कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
पुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता
डहाणू जव्हार हा मुख्य राज्यमार्ग असून येथून रोज शेकडो वाहनांची रेलचेल सुरू असते. राज्य मार्गावरून विद्यार्थी, रुग्ण, आणि नागरिकांची दळणवळण सुरू असताना पुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुलाचे काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नसल्यामुळे शहापूर सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> सिल्वर पापलेटला ‘राज्य मासा’ चा दर्जा; पापलेट संवर्धन करण्यासाठी उपाय योजना आखणे होणार शक्य
याविषयी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढला आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू असताना खालून होणाऱ्या वाहतुकीसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पुलाखालून सतत वाहतूक सुरू असल्यामुळे प्रसंगी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. – भागवत शिंदे, प्रवाशी